ठराविक नगरसेवकांनाच निधी कसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:41 AM2021-03-27T04:41:47+5:302021-03-27T04:41:47+5:30

ठाणे : कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावल्याचे महापालिका सांगते. मग अर्थसंकल्पात काही ठराविक नगरसेवकांना १०० ते १५० कोटी ...

How to fund certain corporators | ठराविक नगरसेवकांनाच निधी कसा

ठराविक नगरसेवकांनाच निधी कसा

Next

ठाणे : कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावल्याचे महापालिका सांगते. मग अर्थसंकल्पात काही ठराविक नगरसेवकांना १०० ते १५० कोटी दिले जाणार असतील इतर नगरसेवकांच्या प्रभागात कामे कशी होणार असा सवाल भाजपाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी अर्थसंकल्पीय महासभेत उपस्थित केला. मोठमोठ्या प्रकल्पांना निधी देण्याऐवजी जी अत्यावश्यक आणि महत्त्वाची कामे असतील त्यासाठी निधी देणे अपेक्षित असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

काही दिवसांपासून अर्थसंकल्पावर महासभेत चर्चा सुरू आहे. स्थायी समिती समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पात काही ठराविक नगरसेवकांना झुकते माप देण्यात आले आहे. कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे, असे असताना नव्या प्रकल्पांसाठी निधी कशासाठी, थीमपार्क, बॉलिवूड पार्क आदींसाठी पुन्हा ३० कोटींची तरतूद कशासाठी असा सवालही यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. आधीच्याच प्रकल्पांची अवस्था काय आहे, हे समस्त ठाणेकरांना माहीत आहे. असे असताना पुन्हा अशा प्रकल्पांसाठी निधी का द्यायचा असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.

ठाणे शहर हे तलावांचे आणि उद्यानांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. परंतु, उद्यानांसाठी निधीच नसतो. मात्र, खर्चिक प्रकल्पांसाठी तो कसा दिला जातो, असे विचारून दादोजी कोंडदेव क्रीडा गृह असेल किंवा शरदचंद्र पवार स्टेडिअम यावर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. या क्रीडागृहाचा वापर खेळाडूसाठी होतो का? केवळ आयपीएलच्या जाहिरातींसाठी हायमास्टचे अट्टाहास केला जात असल्याची टीका देखील त्यांनी केली.

५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी हवीच

सत्ताधारी शिवसेनेने मागील महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस ठाणेकरांच्या ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, कदाचित आता त्यांना याचा विसर पडला असेल. तरी देखील आम्ही त्याची आठवण करून देऊ. ठाणेकरांना ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: How to fund certain corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.