१ मे पासून लसीकरण कसे करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:53+5:302021-04-28T04:43:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : १ मे पासून १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. परंतु सध्या रोजच्या ...

How to get vaccinated from May 1? | १ मे पासून लसीकरण कसे करणार?

१ मे पासून लसीकरण कसे करणार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : १ मे पासून १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. परंतु सध्या रोजच्या रोज लसींचा अपुरा साठा येत असल्याने शहरातील लसीकरण मोहीम कोलमडलेली आहे. महापालिका हद्दीत ५६ लसीकरण केंद्रांपैकी केवळ २६ केंद्र सुरु आहेत. त्यामुळे जी केंद्र सुरु आहेत, त्या केंद्रांवर गर्दी दिसत आहे. त्यामुळे लसींचा साठा उपलब्ध झाला नाही तर १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण कसे करायचे असा पेच ठाणे महापालिकेसमोर आहे.

ठाणे महापालिका हद्दीत जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. सुरुवातीला लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने महापालिका हद्दीत टप्प्याटप्प्याने ५६ केंद्र सुरु केली. जोपर्यंत लसींचा साठा उपलब्ध होता तोपर्यंत या ५६ केंद्रांवर रोजच्या रोज लसीकरण सुरु होते. परंतु फेब्रुवारी अखेरपासून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने महापालिकेच्या केंद्रांची संख्या कमी अधिक प्रमाणात सुरु असल्याची दिसून आली. कधी ४५ ते कधी ४० केंद्रावर लसीकरण सुरु होते. त्यात आता अगदी तुटपुंजा प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने मंगळवारी लसीकरण केंद्रांची संख्या २६ वर घसरल्याचे दिसून आले. लसींच्या साठ्याचे नियोजन करुन पुढील दोन ते तीन दिवस हा साठा पुरविण्यासाठी पालिकेने काही केंद्र बंद केल्याचे दिसून आले. परंतु एका दिवसात तब्बल ३० केंद्र बंद झाल्याने लसीकरण मोहीम कोलमडल्याचे चित्र शहरात दिसत होते. त्यामुळे ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयात ताण वाढल्याचे दिसत होते.

ठाणे महापालिकेने आतापर्यंत २ लाख ७९ हजार १६० जणांचे लसीकरण पूर्ण केले आहे. परंतु प्रत्यक्षात लसींचा साठा पुरेसा उपलब्ध झाला असता तर हे प्रमाण चार लाखांच्या आसपास नक्कीच गेले असते असे पालिकेचे म्हणणे आहे. साठा कमी जास्त प्रमाणात येत असल्याने अशीच परिस्थिती राहिली तर लसीकरण मोहिमेला पुढील दोन वर्षे देखील कमी पडतील असेही आता बोलले जात आहे.

ठाण्यातील एकूण लसीकरण केंद्र - ५६

सध्या सुरु असलेले केंद्र -२६

दररोज किती जणांना लस देण्याचे उद्दिष्ट : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ५६ केंद्र सुरु असताना जवळजवळ १५००० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. परंतु केंद्राची संख्या निम्म्यावर आल्याने हे प्रमाण ७ ते ८ हजारांच्या घरात आले आहे.

१ मे नंतरचे नियोजन काय

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या लसींच्या पुरवठ्यावर केंद्रांचे नियोजन केले जात आहे. परंतु आता १८ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याचे निश्चित झाल्याने प्रत्येक केंद्रावर गर्दी वाढणार आहे. याचा अंदाज पालिकेला देखील आहे, त्यामुळे लसींच्या साठ्यावर लसीकरण केंद्राचे नियोजन केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. ज्यांना लस घ्यायची असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने कोणालाही लस दिली जाणार नसल्याचे सध्या तरी सांगितले जात आहे. म्हणजेच जेवढे नोंदणी केलेले असतील तेवढेच केंद्रावर आले तर गर्दी देखील कमी होऊ शकणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करणे देखील सोपे जाणार आहे.

आतापर्यंत २६ टक्के उद्दिष्ट पूर्ण

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील लसीकरणाचे अवघे २६ टक्केच उद्दिष्ट सध्या तरी पूर्ण झाले असल्याचे दिसत आहे. जानेवारीपासून ही मोहीम सुरु असून तीन महिन्यात २६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे दिसत आहे.

पहिला डोस किती जणांना दिला

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत पहिला डोस २ लाख २२ हजार २० जणांना देण्यात आला आहे. दुसरा डोस केवळ ५७ हजार १४० जणांना देण्यात आला आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत चार लाखांच्या आसपास नागरिकांना लस देणे अपेक्षित होते.

................

१ मे पासूनचे नियोजन आम्ही आमच्या पातळीवर करीत आहोत. लसींचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी देखील राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. लसींचा साठा उपलब्ध झाल्यास संपूर्ण क्षमतेने लसीकरण केंद्र सुरु राहतील.

(संदीप माळवी - उपायुक्त, ठामपा)

Web Title: How to get vaccinated from May 1?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.