महापालिका शाळांमध्ये ९१ शिक्षकांची कमतरता, शिक्षणाचा दर्जा सुधारणार कसा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 01:34 AM2020-01-22T01:34:50+5:302020-01-22T01:45:38+5:30
शाळांचा पट १० टक्के वाढल्याचा दावा शिक्षण विभागाने केला असतांना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याची गंभीर बाब समोर आली.
ठाणे : ठाणे महापालिका शिक्षण विभागाने नको ते प्रस्ताव आणण्याच्या नादात महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेच्या मराठी शाळांबरोबरच उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये तब्बल ९१ शिक्षकांची कमतरता असल्याचे सोमवारच्या महासभेत उघड झाले. एकीकडे शाळांचा पट १० टक्के वाढल्याचा दावा शिक्षण विभागाने केला असतांना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याची गंभीर बाब समोर आली.
गेल्या काही महिन्यांत खर्चिक आणि वादग्रस्त प्रस्ताव पुढे आणल्याने शिक्षण विभागावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या शाळांमध्ये नमके किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, याचेच गणित चुकल्याची बाब सोमवारी झालेल्या महासभेत समोर आली. दुसरीकडे शाळांमध्ये शौचालयांची दुरवस्था, बसण्यासाठी बेंचेस नसण्यासह पुरेसे शिक्षक नसल्याची बाब दप्तराचे ओझे कमी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करतांना शिवसेनेचे नरेश मणेरा यांनी निर्दशनास आणली. दुसरीकडे ज्या ठिकाणी विद्यार्थी कमी आहेत, त्याठिकाणी शिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या जास्त आहे. परंतु, येऊर येथील शाळेचा पट जास्त असताना आणि या शाळेत आदिवासी मुले जास्त संख्येने येत असतांना त्याठिकाणी मात्र शिक्षकांची संख्या पुरेशी नसल्याचा आरोप शिवसेनेच्या परिषा सरनाईक यांनी केला. त्यामुळे इतर ज्या शाळांमध्ये शिक्षक जास्त आहेत, त्यांना ज्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे, किंवा ज्या शाळांमध्ये शिक्षक नाहीत,अशा ठिकाणी पाठवावे, यावे अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी शिक्षकांच्या अदबदलीबाबत आक्षेप नोंदविला. एखाद्या ठिकाणचे शिक्षकांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्याचा प्रयत्न केला तर त्याच भागातील लोकप्रतिनिधींकडून दबाव आणला जातो, किंवा तो शिक्षकदेखील राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शिक्षकांचे समायोजन न करता त्यावर काय तोडगा काढता येईल का, याचा विचार शिक्षण विभागाने करावा, अशी सूचना त्यांनी दिली.
रिक्त जागांसाठी जिल्हा परिषद, शिक्षण उपसंचालकांकडे पत्रव्यवहार
महापालिका शाळांमध्ये किती शिक्षक कमी आहेत, असा सवाल लोकप्रतिनिधींनी केला असता, यावर शिक्षण विभागाने मराठी शाळांमध्ये ५६ शिक्षकांची गरज असल्याची माहिती दिली. परंतु, केवळ मराठी माध्यमासाठीच नाही तर उर्दू माध्यमामध्येही २५ आणि हिंदी माध्यमामध्ये १० शिक्षकांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
या तीन माध्यमांसाठी ९१ शिक्षकांची गरज असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी सुधारणार असा सवाल या निमित्ताने आता उपस्थित झाला आहे. सध्याच्या घडीला महापालिका शाळांमध्ये ३५ हजारांच्या आसपास विद्यार्थी असून त्यांना शिकविण्यासाठी ९०० शिक्षक कार्यरत आहेत.
मात्र, रिक्त झालेल्या जागांसाठी जिल्हा परिषद आणि शासनाच्या उपसंचालक विभागाकडे पत्रव्यवहार करून अतिरिक्त शिक्षक मिळावेत,अशी मागणी केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
पदोन्नती दिल्याने शिक्षकांची कमतरता
शिक्षकांची कमतरता असल्याची बाब खरी असली तरी वास्तविक पाहता मध्यतंरी ज्या शाळांंना मुख्याध्यापकांची गरज होती, त्याठिकाणी यामधीलच शिक्षकांना पद्दोन्नती दिल्याने शिक्षकांची संख्या कमी झाल्याचे सांगून जिल्हा परिषदेकडे शिक्षकांची मागणी केली असून १५ दिवसांत ते मिळतील, असा दावा शिक्षण विभागाने केला.