हाऊ इज द जोश! लोकमत महामॅरेथॉनच्या बीब एक्स्पोचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्धाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 08:45 AM2022-12-04T08:45:56+5:302022-12-04T08:46:40+5:30
बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांंमध्येही मॅरेथॉनविषयी कुतूहल होते. एक्सपोच्या ठिकाणी असलेल्या विविध कंपन्यांच्या स्टॉल्सवर अनेक स्पर्धक रेंगाळतांना दिसले.
ठाणे : तरुण-तरुणींचे जथ्थे उत्साहात येत होते आणि रविवारी होणाऱ्या महामॅरेथॉनचा बीब प्राप्त झाल्यावर ‘हाऊ इज द जोश’चा घोष करीत होते... पोलिस, निवृत्त लष्करी अधिकारी बीब घेण्याकरिता आवर्जून आले होते व सहकाऱ्यांना भेटल्यावर बोटांनी व्ही फॉर व्हिक्टरीची खुण करून सेल्फी घेत होते... फिटनेसबाबत जागरूक असलेले ठाणेकर सहकुटुंब येऊन किट घेऊन जाण्यापूर्वी बीब एक्स्पोमध्ये रेंगाळत होते. तेथील वेगवेगळ्या स्टॉल्सवर जाऊन खरेदी करीत होते.
लोकमत महामॅरेथॉनच्या बीब एक्स्पोचे शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तत्पूर्वीच शेकडो तरुण-तरुणींनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावून बीब घेत होते. ‘आय लव्ह मॅरेथॉन’ या अक्षरांसोबत फोटो काढण्याची संधी एक्सोला हजर राहिलेल्या बहुतेकांनी सोडली नाही. तिथल्या तिथे आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना अनेक दिसत होते. सेल्फी घेण्याकरिता अनेकांची धडपड सुरू होती. एक्स्पोला हजर राहिलेले नामांकित धावपटू, सेलिब्रिटी व राजकीय नेते यांच्यासोबत फोटो काढण्याकरिता चुरस सुरू होती.
बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांंमध्येही मॅरेथॉनविषयी कुतूहल होते. एक्सपोच्या ठिकाणी असलेल्या विविध कंपन्यांच्या स्टॉल्सवर अनेक स्पर्धक रेंगाळतांना दिसले. आरोग्यदायी उत्पादने, सकस आहार, स्पोर्ट शू, टी-शर्ट, बॅगा आदींचे स्टॉल्स एक्स्पोला येणाऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. तीन, पाच, १० आणि २१ किलोमीटरच्या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या आबालवृद्धांना रांगेत उभे राहून किट मिळाल्यावर त्यामधील बीब, टी-शर्ट पाहून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. अनेक स्पर्धकांच्या सोबत आलेली त्यांची लहान मुले आई-वडिलांना मिळालेली किटची गुडी बॅग खांद्याला लटकवून सभागृहात दुडुदुडू धावत होती. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्याकरिता संगीत व गीतांचा नजराणा पेश करण्याकरिता मातब्बर कलाकार हजर होते.