माजी आमदारांनी किती कामे केली? मेहता यांचे आव्हान : ४८ कोटी आणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 03:15 AM2018-08-30T03:15:19+5:302018-08-30T03:15:45+5:30
भाजपाचे संघटन व वेगवेगळ्या पक्षांतील चांगल्या व्यक्ती घेतल्यामुळे पालिकेत सत्ता मिळाली, असे सांगतानाच भाजपातील एकदोन खड्यांना वेळीच बाजूला करू, असा सूचक इशारा आमदार नरेंद्र मेहता यांनी वर्षपूर्र्ती कार्यक्रमात दिला.
मीरा रोड : भाजपाचे संघटन व वेगवेगळ्या पक्षांतील चांगल्या व्यक्ती घेतल्यामुळे पालिकेत सत्ता मिळाली, असे सांगतानाच भाजपातील एकदोन खड्यांना वेळीच बाजूला करू, असा सूचक इशारा आमदार नरेंद्र मेहता यांनी वर्षपूर्र्ती कार्यक्रमात दिला. आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार मुझफ्फर हुसेन व गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी सरकारकडून आणलेली पाच कामे मोजून दाखवावीत. मी राजीनामा देईन, असे आव्हान देत चार वर्षांत मी ४८ कोटी आणले, असा दावा केला.
मी ७५ एमएलडी पाणी व नळजोडण्या सुरू केल्या. काँक्रिट रस्त्यांसाठी प्रत्येकी १०० कोटी आणले. शेवटच्या वर्षात तहसीलदार कार्यालय, पोलीस आयुक्तालय आदी अनेक कामे होणार आहेत. वचननाम्यातील ९० टक्के कामे एका वर्षातच केली. मेट्रो मंजूर झाली, पण उड्डाणपूल रद्द झाल्याने मेट्रोखाली फ्लायओव्हर हवा म्हणून विलंब झाल्याचे मेहता म्हणाले. सूर्याचे पाणी २००९ मध्ये खासदार संजीव नाईक यांच्यावेळी मंजूर झाले. पण, इतकी वर्षे पाणी आले नाही. नागरिकांवर कर न वाढवता सुविधा देत आहे, असे मेहता यांनी सांगितले.
पत्रकारांवर रोष
सत्तेत आहोत म्हणून विरोध होणार. ज्यांनी सत्ता दिली त्या नागरिकांना हिशेब दिला पाहिजे. आपल्यावर आरोप व टीका केली जाते, असे सांगत पत्रकारांबद्दल मेहतांनी रोष व्यक्त केला. चुकले तर जरूर लिहा, असे सांगतानाच माझ्यासमोर येऊन बोलायची कुणाची हिंमत नाही, असे ते म्हणाले.