आणखी किती बळी हवेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:42 AM2018-03-27T00:42:23+5:302018-03-27T00:42:23+5:30

पश्चिमेकडील कर्णिक रोडवर गेल्या महिन्यात एका शाळकरी मुलाला अपघातात नाहक आपला जीव गमवावा लागला होता.

How many more beels should be? | आणखी किती बळी हवेत?

आणखी किती बळी हवेत?

Next

कल्याण : पश्चिमेकडील कर्णिक रोडवर गेल्या महिन्यात एका शाळकरी मुलाला अपघातात नाहक आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, यातून केडीएमसी प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. याची प्रचीती आधारवाडी जेल रोडची दयनीय अवस्था पाहताना येते. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम तर अपूर्ण राहिलेच, पण त्याचबरोबर यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे येथून जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागते आहे. याशिवाय, येथील धुळीमुळे या परिसरात राहणाºया नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. एकंदरीत परिस्थिती बघता प्रशासन आणखीन बळी जाण्याची वाट बघते आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आधारवाडी चौकाची गणना महत्त्वाच्या चौकांत केली जाते. मुंबई-मुरबाड-नगर मार्ग आणि नाशिक मार्ग जोडणारे रस्ते या चौकातून जात असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. यात दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचाही समावेश आहे. यामुळे अनेकदा या चौकात सकाळ-संध्याकाळ वाहतूककोंडीचे चित्रही कायम दिसून येते. चौकातून जाणाºया आधारवाडी जेल रोडची अवस्था अत्यंत बिकट आहे. संथगतीने सुरू असलेले या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्णपणे खोळंबले आहे. पावसाळ्यात या रस्त्याची पुरती चाळण झाली होती. गणेशोत्सवात काही प्रमाणात डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न झाला, पण त्यानंतरही रस्त्यांची खड्डेमय अवस्था ‘जैसे थे’ राहिली आहे. गेले अनेक महिने ही परिस्थिती अशीच असूनही महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
जीवघेण्या खड्ड्यांमधून वाट काढणे बिकट बनले असताना धुळीचा प्रचंड त्रास पादचारी आणि रहिवाशांना सहन करावा लागतो आहे. या भागातील टोलेजंग इमारतीपर्यंत काँक्रिटीकरणाचे काम झालेले आहे, मग पुढील चाळी आणि घरांसमोरील रस्त्याकडे झालेला कानाडोळा यामागचे गौडबंगाल काय, असाही सवाल उपस्थित होत आहे.
दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. जर आताच रस्त्याची अवस्था दयनीय असेल, तर पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनणार आहे. स्थानिक नगरसेवक वरुण पाटील यांच्या म्हणण्यानुसार महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. २०१४-१५ मध्ये काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते, पण प्रशासनाची मानसिकता नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. काही तांत्रिक अडचणी असतील, तर निदान डांबराने तरी खड्डे भरावेत, जेणेकरून रस्ता सुस्थितीत होईल, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: How many more beels should be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.