निर्लज्ज यंत्रणेला अजून किती बळी हवेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:04 AM2019-09-16T00:04:49+5:302019-09-16T00:04:54+5:30
पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडणे, हे काही नवीन राहिलेले नाही. त्याचा त्रास सामान्य नागरिकांसह वाहनचालकांना होतो.
पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडणे, हे काही नवीन राहिलेले नाही. त्याचा त्रास सामान्य नागरिकांसह वाहनचालकांना होतो. दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांमुळे एवढे बळी, तेवढे जखमी अशा बातम्या झळकतात. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्त्यांची कामे केली जातात. अधिकारी, कंत्राटदार, नेते यांचे खिसे भरले जातात. पण आपल्या या वाईट कृत्यातून कुणीतरी स्वत:चा मुलगा, पती किंवा वडील कायमचे हरवून बसतात, याची साधी जाणही त्यांना नसते. खड्ड्यांचा बळी ठरलेल्या अशा व्यक्तींच्या कुटुंबांवर कसे संकट ओढवते, एकूणच यंत्रणेबद्दल त्यांच्या काय भावना आहेत, याचा प्रातिनिधीक स्वरूपात ‘लोकमत’चे प्रतिनिधी मुरलीधर भवार, पंकज पाटील, सदानंद नाईक, नितीन पंडित आणि धीरज परब यांनी घेतलेला हा आढावा.
क ल्याण डोंबिवली महापालिका दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र दरवर्षी पावसाळ््यात खड्डे हे पडतात. मागील वर्षी महापालिका हद्दीत पाच जणांचा मृत्यू झाला. यावर्षी अरूण महाजन यांचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यांचा अपघात पत्रीपुलावर घडला. हा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येत असूनही त्यांनी या अपघाताची जबाबदारी स्वीकारलेली नाही. महाजन हे त्यांच्या कुटुंबाचा आधार होते. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची वृद्ध आई, पत्नी, मुलगा, सून, नात आणि पुण्याला शिक्षण घेणारे त्यांची दोन मुले ही निराधार झाली आहेत. त्यांच्या कुटुंबातील कमावती व्यक्ती गेल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. महाजन हे सरकारी यंत्रणांचे बळी ठरले. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात अद्याप कोणी दिलेला नाही. त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सरकारी यंत्रणेच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला नाही किंवा दुसरीकडे खड्डेही बुजविले गेलेले नाहीत. सरकारी यंत्रणांना आणखी किती बळी हवेत, असा सवाल महाजन कुटुंबीयांसह खड्ड्यांचे गंभीर परिणाम भोगणाऱ्या नागरिकांकडून केला जात आहे.
अरुण महाजन हे ५९ वर्षे वयाचे गृहस्थ. ते मूळचे भुसावळचे. शालेय शिक्षण गावाला झाले. गावाला शेती नसल्याने नोकरीच्या शोधात ते कल्याणला आले. त्यांनी डोंबिवलीच्या औद्योगिक वसाहतीमधील एका फार्मा कंपनीत नोकरी पत्करली. त्याठिकाणी ते अस्थायी कामगार होते. पगार काही फारसा नव्हता. रात्रपाळी व ओव्हरटाईम करून त्यांच्या हाती केवळ २० हजार रुपये पगार येत होता. सरकारी नियमानुसार किमान वेतनही त्यांच्या हाती पडत नव्हते. त्यांना तीन मुलगे. मोठा चेतन आणि महेश, मिलिंद ही जुळी मुले. त्यांना शिक्षण देणे हे त्यांच्यापुढे एक मोठे आव्हान होते. पत्नी रेखाही संसाराला हातभार लावण्यासाठी डोंबिवलीतील एका प्रिटींग प्रेसमध्ये कामाला जात होत्या. मोठा मुलगा चेतन हा नुकताच एका कंपनीत कामाला लागला. त्याचे लग्न झाले आहे. महेश आणि मिलिंद या दोघांना त्यांनी पुण्याला आयटीआयत प्रवेश घेतला होता. त्याठिकाणी ही दोन्ही मुले वसतिगृहात राहून शिकत आहेत. याचे महाजन यांना समाधान होते. काटकसर करून त्यांनी दुचाकी घेतली होती. या दुचाकीने ते पत्नी रेखाला घेऊन कामावर जायचे. ९ आॅगस्ट रोजी रात्रपाळी आटोपून अरूण सकाळी कल्याणला घरी जाण्यासाठी निघाले. पावणेसातच्या दरम्यान पत्रीपुलाजवळ त्यांची दुचाकी आली. पुलावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने ते पडले. तेवढ्यात मागून येणाºया ट्रकने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही बातमी कळताच महाजन कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला. महाजन राहत असलेल्या खंडेलवाल कॉलनीत हे वृत्त पसरले. तेव्हा सुरूवातीला त्यांच्या पत्नीही गेल्या असाव्यात असा काही जणांचा समज झाला. कारण पती-पत्नी दोघेही दुकाचीने नेहमी कामावर जायचे. पण रात्रपाळीमुळे त्यादिवशी त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत नव्हत्या. महाजन यांनी मृत्यूपूर्वी दहा दिवस आधीच त्यांच्या जुन्या मित्र मंडळींशी फोनवरुन संवाद साधून चौकशी केली होती. त्यांची सून बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. नातीला खेळविण्याचे त्यांचे स्वप्न होते. अपघात होण्याच्या दोनच दिवस आधी महाजन यांनी नातीचा चेहरा व्हिडीओ कॉलद्वारे पाहिला होता. नात काही दिवसांनी घरी येणार. तिला खेळविण्याचा आनंद घेणार या कल्पनेने ते खूप आनंदित होते. मात्र नातीची भेट त्यांच्याशी होण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांची आई अरूण यांची अजूनही वाट पाहत आहेत. अरुण कामावरुन येईल अशी त्यांची भाबडी आशा अजून जिवंत आहे. मुलाच्या आठवणीने आईच्या डोळ््यातील धार काही थांबत नाही. तर पत्नी रेखा यांनाही अश्रू अनावर झाले आहेत. महिना उलटून गेला, तरी ते गेले याच्यावर कुटुंबाचा अजूनही विश्वास बसत नाही.
मुलगा चेतन याच्यावर आता आई, आजी, लहान मुलगी, पत्नी, दोन भाऊ यांची जबाबदारी आली आहे. त्याने लग्न झाल्यावर घर घेण्यासाठी १७ लाखाचे कर्ज काढले होते. त्यामुळे त्याच्या पगारातून निम्मी रक्कम कर्जाच्या हप्त्यात जाते. उरलेले केवळ दहा हजार रुपये हाती येतात. या दहा हजारात घर कसे चालवायचे. दोन भावांचे शिक्षण, आई, आजी, मुलगी व पत्नीचा सांभाळ कसा करायचा, असा त्याच्यापुढे प्रश्न उभा ठाकला आहे. बाबा आमच्या जगण्याचा आधार होते. ते गेल्याने आम्ही निराधार झालो. आमचे कुटुंब सध्या आर्थिक विवंचनेत सापडले आहे. दोन भावांचे शिक्षण थांबू शकते, असे तो म्हणाला. बाबा गेल्याने आईने कामावर जाणेही बंद केले आहे.
बाबा ज्या कंपनीत कामाला होते तिथे ते कायमस्वरुपी कामगार नसल्याने कंपनीकडून आमच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळालेली नाही. पत्री पुलावर अपघात घडल्याने महापालिकेच्या हद्दीत हा रस्ता नसल्याने त्यांनीही मदतीच्या बाबतीत हात वरती केले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी साधी विचारपूस करण्यासाठीही आमच्या घरी आले नाहीत. कोट्यवधींचे प्रकल्प राबविणाºया महामंडळाकडून खड्डे भरले गेले नाहीत म्हणून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी पैसा नाही. ही लंगडी सबब मला तरी आश्चर्यकारक वाटते असे चेतन यांनी सांगितले. पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ होता. त्याना मदत दिली जाणे योग्य होते. मात्र आम्हालाही मदतीचा हात हवा आहे. आमच्या घरी सरकारी यंत्रणा फिरकली नाही. त्याचबरोबर आमदार, खासदारांनाही आमच्या दुखाशी काही एक देणेघेणे नसल्याने त्यांनीही आमच्या घराकडे पाठ फिरवली, अशी भावना चेतन याने व्यक्त केली.
>कुटुंबांना
सावरणार कोण?
धोकादायक इमारत पडून मृत्यू झालेल्यांना, पूरग्रस्तांना सरकारकडून मदत केली जाते. सरकारी यंत्रणेच्या निष्काळपणामुळे खड्डे भरले नाहीत. त्याची जबाबदारी सरकार घेत नाही. खड्डे भरण्यात दिरंगाई केलेल्या जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई केली जात नाही. खड्ड्यात पडून मरणाऱ्यांचा जीव कवडीमोल आहे अशी सरकारी मानसिकता यातून प्रतीत होते. जे महाजन कुटुंबीयांसोबत झाले आहे ते मागच्यावर्षी खड्ड्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांच्या कुटुंबासोबत झाले आहे. त्यांच्या निराधार कुटुंबांना कोण सावरणार, मदतीचा हात कोण देणार हा खरा
प्रश्न आहे.