अजून किती वर्षे आम्हाला तुम्ही बाहेर ठेवणार, श्रीगौरी सावंत यांनी उपस्थित केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 03:13 PM2022-04-13T15:13:07+5:302022-04-13T15:15:46+5:30
Thane News: तृतियपंथी समाजाकडे टाळ्या वाजवण्याच्या पलीकडे एक माणूस आपण पाहिले पाहिजे. आम्हाला रोजगार नाहीतर आम्ही भीक मागणार नाही का असा सवालही त्यांनी यावेळी केला.
ठाणे - तृतियपंथी समाजाकडे टाळ्या वाजवण्याच्या पलीकडे एक माणूस आपण पाहिले पाहिजे. आम्हाला रोजगार नाहीतर आम्ही भीक मागणार नाही का असा सवालही त्यांनी यावेळी केला. तृतियपंथीना न मिळणाऱ्या आरोग्य सुविधा यावर त्यांनी परखड भाष्य केले.भारताचे संविधान जर कोणता भेदभाव करत नाही तर अजून किती वर्षे तुम्ही आम्हाला बाहेर ठेवणार आहात असा प्रश्न श्रीगौरी सावंत यांनी उपस्थित केला. यावेळी गायत्री आणि त्यांचे नाते उलगडले.
कोमसाप आयोजित दुसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात श्रीगौरी यांनी मी ते आम्ही या विषयावरील मुलाखतीच्या माध्यमातून तृतियपंथीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कोरोनाकाळात तृतियपंथी आणि देह विक्रेय महिलांना कोणत्याहीप्रकारे मदत आली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपण २१ व्या शतकात आहोत पण आमच्याकडे रेशन कार्ड नाही. सरकारकडे अद्यापही आमच्या समाजाचा डेटा नाही. आम्ही देखील समाजाचा घटक आहोत आमचे आर्थिक सक्षमीकरण व्हायला हवे. आमहाला नोकरी अंडी शिक्षणाची गरज आहे. स्त्री - पुरूषांसाठी जो कायदा आहे तो आमच्या समाजासाठी देखील असायला हवा असे त्या म्हणाल्या. ज्यावेळी मी या जगाचा निरोप घेईल त्यावेळी मला या तिरंग्यात लपेटून जायचे आहे इतके काम मला करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. पंकज दळवी यांनी मुलाखत घेतली. कार्यक्रमाला ज्योती ठाकरे आणि डॉ. अरुंधती भालेराव यांची विशेष उपस्थिती होती.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तृतियपंथीचे बचत गट तयार केले जाणार आहे. तसा ठराव बोर्ड मीटिंगमध्ये केल्यानंतर या बचत गटाच्या निधीसाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचे अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी सांगितले.