४०० रुपयांचा गॅस कितीला झाला?, विद्या चव्हाणांनी करुन दिली स्मृती इराणींची आठवण
By सदानंद नाईक | Published: January 13, 2023 05:52 PM2023-01-13T17:52:50+5:302023-01-13T17:54:23+5:30
उल्हासनगरात जनयात्रेनिमित्त आलेल्या पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले
सदानंद नाईक
उल्हासनगर : राष्ट्रवादीच्या जनयात्रेचे औचित्य साधून पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत महागाई विरोधात व पंतप्रधान मोदींच्या धोरणावर टीकास्त्र सोडले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पंचम कलानी, पक्षाचे नेते महेश तपासे, युवानेते कमलेश निकम, मनोज लासी माजी नगरसेवक व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
उल्हासनगरात जनयात्रेनिमित्त आलेल्या पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. चव्हाण यांनी शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून खेमानी परिसरात सभा घेतली. यावेळी चव्हाण यांनी भाजप, पंतप्रधान मोदी यांच्या धोरणावर व महागाईवर टीकास्त्र सोडले. गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरलेल्या केंद्रीयमंत्री इराणी आपल्याला दिसल्या का? असा प्रश्न त्यांनी केला. तसेच ४०० रुपयांचे गॅस कितीला झाला, असा प्रश्न महिलावर्गांला करून मोदी सरकारला येणाऱ्या निवडणुकीत गाडून टाकण्याचे आवाहन केले. यावेळी शहरातील पक्ष पदाधिकाऱ्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पंचम कलानी, कमलेश निकम, मनोज लासी आदिनीही यावेळी मार्गदर्शन केले.