कशी केलीस माझी दैना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:32 AM2019-06-16T00:32:32+5:302019-06-16T00:32:47+5:30
डोंबिवली आणि त्यापुढील टिटवाळा, वांगणी, मुरबाडचा पट्टा हा ठाण्यापर्यंत रेल्वेला समांतर रस्त्याने जोडण्याबाबत वारंवार चर्चा झाली.
- मिलिंद बेल्हे
डोंबिवली आणि त्यापुढील टिटवाळा, वांगणी, मुरबाडचा पट्टा हा ठाण्यापर्यंत रेल्वेला समांतर रस्त्याने जोडण्याबाबत वारंवार चर्चा झाली. पण राजकीय नेतृत्वाची उदासीनता, अभ्यासाचा अभाव, कणखरपणाची कमतरता आणि दबावगट निर्माण करण्यात त्यांना आजवर आलेले अपयश यामुळे किमान अर्ध्या कोटीची लोकसंख्या दररोज रेल्वे प्रवासाच्या यमयातना सोसते आहे. कल्याणहून कर्जत, टिटवाळा, शहापूर, मुरबाड, भिवंडी जोडलेले आहे. पण मुंब्रा ते डोंबिवली आणि पुढे कल्याण जोडण्याची मागणी पुढे आली की, राजकीय व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा का हाय खाते तेच कळत नाही.
आधी हा मार्ग व्यवहार्य नाही, असेच सारे अधिकारी सांगत होते. म्हणजे मुंबईमुळे लोकसंख्या वाढली, असे कारण पुढे करत सुविधा देण्यासाठी, नवे प्रकल्प, योजना एका छताखाली आणण्यासाठी एमएमआरडीएचा विस्तार करायचा, एका तासात कोठूनही कुठेही प्रवास करता येईल, अशा घोषणा करायच्या आणि नंतर समित्या नेमून त्यातील काही भाग परस्परांना जोडणे कसे अव्यवहार्य आहे, असे सिद्ध करायचे हा कुठला उफराटा न्याय?
पर्यावरणाच्या परवानग्या मिळत नाही, असे कारण त्यासाठी दरवेळी पुढे केले जाते. म्हणजे कळवा-ऐरोली पुलासाठी पर्यावरण आड येत नाही. मध्य रेल्वेला दोन जादा लोहमार्ग टाकण्यासाठी पर्यावरण अडथळा ठरत नाही. जलवाहतूक सुरू करण्यात पर्यावरण खोडा घालत नाही. ठाण्याहून म्हाताडीला आणि पुढे भिवंडीमार्गे बुलेट ट्रेन बोईसरला नेताना पर्यावरण डोळे वटारत नाही. मुंबई-दिल्ली मालवाहतुकीचा मार्ग (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर), मुंबई-नागपूर, मुंबई-बडोदा यातील कोणत्याच मार्गाला पर्यावरण त्रास देत नाही. फक्त मुंब्रा ते डोंबिवली आणि कल्याण जोडण्यातच ते आडवे येते, हे कसे?
यावर तोडगा म्हणून डोंबिवलीच्या पश्चिमेतून कोनगावापुढील पिंपळासपर्यंत रस्त्याचे नियोजन केले गेले. ते काम एकाच बाजूने प्रगतीपथावर (?) आहे. हा मार्ग पूर्ण जरी झाला, तरी डोंबिवलीहून ठाण्याला जाण्यासाठी पिंपळासला जायचे, तेथून कल्याण नाका आणि पुढे अव्याहत गर्दीने भरलेल्या मुंबई-नाशिक महामार्गाने ठाण्यात असा द्राविडी प्राणायम करावा लागणार. हा मार्ग व्यवहार्य की डोंबिवली मुंब्रा जोडणे अधिक सोयीचे, यावर ना लोकप्रतिनिधी बोलतात, ना अधिकारी. हा मार्ग झाला तर रेल्वेला कायमस्वरूपी समांतर-पर्यायी रस्ता तयार होईल. त्यातून कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण अशी सारी उपनगरे जोडली जातील. पार कर्जतपर्यंत थेट बससेवा, कमी खर्चात टॅक्सी, रिक्षा सुरू करता येतील. रेल्वेवरील ताण कमी होईल. शिवाय रेल्वे वाहतूक बंद पडली, तर कायमस्वरूपी पर्यायी वाहतूक सुरू राहू शकेल. पण लक्षात घेतो कोण?
आता प्रश्न रेल्वेचा. ठाणे ते दिवा सहा पदरी मार्गाचे काम रखडलेले असले, तरी ठाण्यापुढील प्रवाशांना सापत्नभावाची वागणूक देण्यात रेल्वे अजिबात कुचराई करत नाही, हे वारंवार सिद्ध होते. गर्दी, गोंधळ, वाहतुकीचा खोळंबा, तांत्रिक अडचणीच्या काळात ठाणे, डोंबिवली, कल्याणहून शटल सेवा सुरू ठेवल्यास प्रवाशांची सोय होते, गर्दीचा निचरा होतो हे लक्षात येऊनही त्याचा विचार का केला जात नाही, ते गौडबंगाल आहे. दरवेळी यावर चर्चा होते. पण रेक (गाड्या) कमी आहेत, असे कारण पुढे केले जाते. आता साध्या गाड्यांऐवजी एसी लोकल खरेदीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता खरोखरीच वाढेल का? सध्याच्या काळात एसी लोकल हीच प्रवाशांची एकमेव गरज आहे का? हे रेल्वेचे अधिकारी स्पष्ट करत नाहीत. दिवा-पनवेल, दिवा- वसई, पनवेल-डहाणू, पनवेल-बोरीवली, पनवेल-कर्जत या मार्गांकडे अधिक लक्ष दिले तर गर्दीवर उतारा मिळू शकतो. पण त्याचा विचार रेल्वे आपल्या सोयीने करते आणि पुरेसा अभ्यास नसल्याने लोकप्रतिनिधी त्यासाठी आग्रह धरत नाहीत. त्या दुष्टचक्र ात सध्या येथील प्रवासी पिळून निघत आहेत. त्यांची दैना कधी दूर होणार, हे तो नियोजनकर्ताच जाणे!
मुंबईत कोणत्याही कामानिमित्त जायचे असेल, तर ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांपुढे रेल्वेवाचून दुसरा पर्याय नाही आणि तोच जर कोलमडला, तर प्रवाशांच्या हालाला पारावार राहत नाही. ठाणे शहर मुंबईला खेटून असल्याने आणि नवी मुंबई महामार्गांनी जोडलेले असल्याने तेथील प्रवासी प्रसंगी रस्त्याचा वापर तरी करू शकतात, पण डोंबिवली आणि त्यापुढील प्रवाशांना कोणी वालीच उरत नाही, हे गेल्या पंधरवड्यातील रेल्वेच्या गोंधळाने पुन्हा सिद्ध केले.