सिडकोचे पंख किती वेळा छाटणार? खासगी कंपनीसाठीच हे सगळं चाललंय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 06:58 AM2022-11-28T06:58:21+5:302022-11-28T06:58:54+5:30

हा छळ कमी म्हणून की काय...

How often will CIDCO's wings be clipped? Working for a private company | सिडकोचे पंख किती वेळा छाटणार? खासगी कंपनीसाठीच हे सगळं चाललंय

सिडकोचे पंख किती वेळा छाटणार? खासगी कंपनीसाठीच हे सगळं चाललंय

Next

नारायण जाधव,
उप-वृत्तसंपादक

राज्य शासनाने पुन्हा एकदा सिडकोचे पंख छाटले आहेत. यावेळी ते ऑरेंज स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या एका खासगी कंपनीसाठी छाटले आहेत. या कंपनीसाठी पेणनजीकच्या नैना परिक्षेत्रातील पाच गावांतील १,१५१.६१ हेक्टर अर्थात २,८७९.२५ एकर इतकी जमीन ‘नैना’मधून वगळली आहे. यात ४६.१५ हेक्टर, अर्थात ११४ एकर जमीन ऑरेंज सिटीत मोडते. हे सर्व पाहता सिंह व मुंग्यांची गोष्ट आणि त्यात माकडांनी घातलेला गाेंधळ आठवताे.
असाच प्रकार सध्या नवी मुंबईसह नजीकच्या उरण-पनवेल-पेण-अलिबाग परिसरात पाहायला मिळत आहे. येथे मुंग्यांच्या भूमिकेत सिडको आहे, तर माकडांच्या भूमिकेत सेझ, एमएसआरडीसी, एमएमआरडीए आणि खासगी बिल्डर आहेत अन् सिंहाच्या भूमिकेत त्या त्या वेळचे राज्यकर्ते.
शासनाने १९९७ साली सिडकोची स्थापना केल्यानंतर या संस्थेने जहरी टीका सहन करून नवी मुंबईसारखे देखणे शहर उभारले. सोबत नवीन औरंगाबाद, नाशिक, लातूर, नांदेड या शहरांना मदत केली. अलीकडे नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम सुरू केले. अशा सिडकोचे पहिल्यांदा पंख छाटले गेले ते नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेनंतर. नंतर जेएनपीटीला मोठी जमीन दिली.

कालांतराने नवी मुंबई विमानतळासाठी स्थापन केलेल्या २७० गावांच्या ‘नैना’ परिक्षेत्राची तर शासनाने पूर्ण वासलात लावली आहे. आधी ‘नैना’मधून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूकडील २ किमी परिघात मोडणाऱ्या खालापूर तालुक्यातील ३० गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळाची १७ फेब्रुवारी २०१६ मध्ये नियुक्ती केली. आश्चर्य आहे ना रस्ते बांधणाऱ्या संस्थेस शहर बांधण्याचे काम. यानंतर पनवेल महापालिकेत ३० गावे गेली. हे कमी म्हणून की काय, नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातून एकेकाळी वगळलेल्या आणि आता पुन्हा नवी मुंबईत आलेल्या १४ गावांच्या नियोजनाचे अधिकार सिडकोकडून काढून एमएमआरडीएकडे सोपविले.

    आता पुन्हा एमएमआरडीए खासगीकरणातून उभारत असलेल्या ग्रोथ सेंटरसाठी पेणजवळील पाच गावांतील १,१५१.६१ हेक्टर अर्थात २,८७९.२५ एकर इतकी जमीन ‘नैना’मधून वगळली आहे. यात ऑरेंज स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या एका खासगी कंपनीचा मोठा वाटा आहे.

    आधीच ‘नैना’च्या ११ टीपींची वासलात लागली आहे, अनेक प्राधिकरणांमुळे त्यांची एक ना धड, भारंभार चिंध्या झालेल्या आहेत, यामुळे विकासकही मेटाकुटीला आले आहेत. यामुळे सिडकोची अवस्था अगदी गोष्टीतील मुंग्यांसारखी झाली आहे.

Web Title: How often will CIDCO's wings be clipped? Working for a private company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.