जोरदार पाऊस होऊनही कल्याणमध्ये टंचाई कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:52 PM2018-07-26T23:52:12+5:302018-07-26T23:52:36+5:30
सदस्यांचा सवाल; स्थायी समितीच्या सभेत मुद्दा गाजला
कल्याण : यंदा जोरदार पाऊस होऊनही कल्याण शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी टंचाई जाणवत असून त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला.
शिवसेना सदस्या माधुरी काळे म्हणाल्या की, माझ्या प्रभागात पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे काही नागरिकांनी संतप्त होऊन सोशल मीडियावर पाणीटंचाईचे व्हिडीओ टाकले आहे. ते माझ्याविरोधात आहेत. पाणीटंचाईमुळे आम्हाला नागरिकांना तोंड द्यावे लागते. त्याचे खरे कारण अधिकारी सांगत नाहीत.
भाजपा सदस्य मनोज राय म्हणाले, कैलासनगर व आमराई या भागात पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. शिवसेना सदस्या छाया वाघमारे यांनीही त्यांच्या प्रभागात पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे सांगितले. अर्जुन भोईर यांनीही त्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, यंदा पाऊस जोरदार पडला असतानाही विविध प्रभागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिकेचे अधिकारी करतात काय? उद्या शुक्रवारी पुन्हा शटडाउन घेतले आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले. सदस्या रूपाली म्हात्रे व अपक्ष सदस्य कुणाल पाटील म्हणाले, ग्रामीण भागात पाणीपुरवठा बाधित झाला आहे. उन्हाळा संपल्यावर पावसाळ्यात तरी पाणी योग्य दाबाने पुरवले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक म्हणाले, मोहने बंधाºयाला १८ वर्षे पूर्ण झाली आहे. या बंधाºयाची देखभाल दुरुस्ती केलेली नव्हती. त्यामुळे शहराच्या पूर्व व पश्चिम भागात पाण्याची समस्या उद्भवली होती. आता देखभाल दुरुस्तीची निविदा काढली आहे. हे काम सुरू केले असून ते चार महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. पावसाळ्यात पाणी पुरेसे असले, तरी वीजपुरवठा सातत्याने खंडित झाला. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. याबाबत ‘महावितरण’शी नुकतीच एक बैठक झाली आहे.
जोरदार पावसामुळे मोहिली जलशुद्धीकरणात पाणी शिरले. त्यामुळे तेथील पंप बंद होते. त्यामुळेही मधल्या काळात पाणीपुरवठ्यावर त्याचा परिमाण झाला. २७ गावांत वितरण व्यवस्थेची काही कामे हाती घेण्यात आली आहे.
प्रसाधनगृहांची होणार दुरुस्ती
७७ प्रभागांतील प्रसाधनगृहांच्या देखभाल दुरुस्तीचे प्रस्ताव मागील बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्याची सविस्तर माहिती अधिकारीवर्गाकडे नसल्याने हे प्रस्ताव स्थगित ठेवले होते. संपूर्ण माहितीनिशी कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यांनी हे प्रस्ताव गुरुवारी सभेत मंजुरीसाठी ठेवले असता त्याला मंजुरी देण्यात आली. अन्य ४५ प्रभागांतील प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीचेही प्रस्ताव घेण्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. परंतु, ७७ प्रभागांतील दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.