२०४७ सालचे मीरा भाईंदर शहर कसे असावे ? सिटी ब्रॅण्डिंग वर मान्यवरांचे मार्गदर्शन
By धीरज परब | Published: February 11, 2024 06:17 PM2024-02-11T18:17:29+5:302024-02-11T18:18:00+5:30
पर्यावरण , शिक्षण , आरोग्य , महिला सक्षमीकरण व शहर सुरक्षा ,
मीरारोड - २०४७ साला पर्यंत मीरा भाईंदर शहर कसे असावे ? ह्यावर महापालिकेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिसंवादात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण , शिक्षण , आरोग्य , शहर सुरक्षा व महिला सक्षमीकरण तसेच सिटी ब्रॅण्डिंग वर भर दिला . त्यामुळे महापालिका आता मान्यवरांनी सुचवलेले मुद्दे किती व कसे अमलात आणते हे महत्वाचे ठरणार आहे .
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात पालिकेने शुक्रवारी आयोजित केलेल्या मीराभाईंदर@२०४७ चे उदघाटन वेळी नाशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त सतीश खडके, वसई विरारचे महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार , मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर, माजी आमदार मुझफ्फर हुसेन आदी उपस्थित होते .
पहिल्या सत्रात लेखक - दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी महिला सबलीकरण, पुरुषी प्रवृत्ती , भ्रष्टाचार व पर्यावरण विषयांवर भूमिका मांडली . ह्या राजकारण्यांना व भ्रष्टाचाऱ्यांना जो पर्यंत त्यांचे आई - वडील इतका पैसा आणतो कुठून ? याचा जाब विचारत नाही तो पर्यंत भ्रष्टाचार थांबणार नाही . झाडे लावण्या पेक्षा प्रचारावर जास्त खर्च करावा लागतो असे जगताप म्हणाले . विनया शेट्टी व प्रीथी मारोली यांनी महिलांच्या विषयांवर विचार मांडले.
दुसऱ्या सत्रात मार्केटिंग गुरु तरूनसिंग चौहान यांनी शहराच्या विकासात शाश्वत शहर ब्रँडिंग या विषयावर मार्गदर्शन केले . शेवटच्या सत्रात महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी सुरक्षित शहर ह्या संकल्पने ची सविस्तर माहिती फिली . २६/११ वेळीचे अनुभव आणि मुंबई शहराचे पोलीस आयुक्त असतानाचे अनुभव त्यांनी उपस्थितांना सांगितले .
शनिवारच्या सत्राची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. दुसऱ्या सत्रात माजी परराष्ट्र सचिव आणि राजदूत असलेले डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी पर्यावरण व युवक या विषयावर आपले विचार व्यक्त केले. एमजीएम विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा शिक्षणतज्ञ सुधीर गव्हाणे यांनी तंत्रज्ञानाचा शिक्षणावरील प्रभाव या विषयावर, तर जागतिक दर्जाचे शिक्षणतज्ज्ञ फ्रान्सिस जोसेफ यांनी,शैक्षणिक धोरण आणि सुधारणा या उपस्थितांना मार्गदर्शन केले . शेवटच्या सत्रात नवजात बालरोग तज्ञ, लेखक, वक्ते डॉ.अमोल अन्नदाते यांनी शाळेवर आधारित आरोग्य शिक्षण कार्यक्रमाची परिणामकारकता या विषयावर प्रेक्षकांशी संवाद साधला.
समारोप प्रसंगी आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन आले होते . परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याचे डॉक्युमेंटेशन करून, त्यावर काम करू तसेच प्रत्येक वर्षी ठरवलेल्या ध्येयांचा आढावा घेऊ, असे महापलिका आयुक्त काटकर यांनी सांगितले .