‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार? सिग्नलवर काही नागरिक विनामास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:45 AM2021-08-12T04:45:28+5:302021-08-12T04:45:28+5:30
स्टार 1029 : रिॲलिटी चेक प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची ...
स्टार 1029 : रिॲलिटी चेक
प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. त्यात ठाणे आणि नवी मुंबईत ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे.
कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने शिथिल केलेल्या निर्बंधांमध्ये कोरोना नियमांना नागरिकांकडून तिलांजली दिली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी हे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण वाढून रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण-डोंबिवलीची लोकसंख्या १७ लाखांच्या आसपास आहे; परंतु आतापर्यंत केवळ पाच लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. एकीकडे लसीकरणाचा खेळखंडोबा सुरू असताना नागरिकांकडून कोरोना नियम पाळण्याकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता कोरोनावर मात करायची कशी, असा सवाल आहे. कल्याण पश्चिमेतील लालचौकी आणि खडकपाडा सिग्नलवर पाहणीवेळी काही नागरिक विनामास्क आढळले, तर काहींनी मास्क तोंडावर न लावता हनुवटीवर ठेवला होता.
--------------------------------
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई नाही
- कोरोनाची पहिली लाट असो अथवा दुसरी लाट यात मास्क न वापरणाऱ्यांविरोधात केडीएमसी आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू आहे; परंतु कोरोनाची घटत चाललेली संख्या पाहता या कारवाईत ढिलेपणा आल्याचे पाहायला मिळत आहे.
- मुख्य रस्ते, चौक, उद्यान, बाजारपेठा याठिकाणीही विनामास्क नागरिक बिनदिक्कतपणे फिरताना दिसतात; परंतु त्याकडे यंत्रणांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
- चारचाकी वाहने आणि दुचाकीवरून प्रवास करणारे नागरिक, रिक्षाचालक यांनाही मास्कचे वावडे असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसत आहे; पण कारवाई होताना दिसत नाही.
-----------------------
- लसीकरणाची गती वाढविण्याचे नाव घेईना
लसीकरण स्थिती
वयोगट - पहिला डोस - दुसरा डोस
१८ ते ४४- ७७,५४१- ८,६६९
४५ ते ५९ - १,२३,३८९- ५१,२६६
६० पेक्षा जास्त - ७८,९०२- ४४,२६३
----------------------------------------
कारवाईचे दावे
एकीकडे विनामास्क कारवाई प्रभावीपणे दिसत नसताना दुसरीकडे कारवाई सुरू असल्याचा दावा पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे.
---------------------------
फोटो आनंद मोरे