लॉकडाऊन झाल्यास जगायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:36 AM2021-04-05T04:36:12+5:302021-04-05T04:36:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. आधीच सलग सहा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. आधीच सलग सहा ते सात महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यात पुन्हा असाच लॉकडाऊन झाल्यास हॉटेल व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यापेक्षा कडक निर्बंध व्हावेत, अशी अपेक्षा ठाण्यातील हॉटेल अॅन्ड रेस्टॉरन्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.
ठाणे शहर हॉटेल संघटनेचे सदस्य पुष्पराज शेट्टी लॉकडाऊनबाबत आपले मत मांडताना म्हणाले की, सध्या हॉटेल व्यवसाय हे ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. शिवाय, रात्री आठनंतर सरकारने दिलेल्या निर्बंधानुसार ते बंद केले जातात. त्यामुळे आधीच हॉटेल व्यावसायिकांच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. सरसकट टाळेबंदीपेक्षा एखाद्याने मास्क घातला नाही, सामाजिक अंतराचे नियम पाळले नाही आणि स्वच्छतेचे नियम पाळले नाहीत तर अशा लोकांवर जरूर कारवाई केली जावी. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे २२ मार्च २०२० पासून हॉटेल, उपाहारगृह बंद ठेवले होते. सलग सात महिने ते बंद पूर्णपणे राहिल्यामुळे हॉटेल व्यवसायाला उतरती कळा लागली होती. अनेक जण यात कर्जबाजारी झाले. काहींनी आत्महत्या केली. त्यावर अवलंबून असलेल्या अनेक कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याच्या वेदना शेट्टी यांनी व्यक्त केल्या आहेत.
ते पुढे म्हणाले, लॉकडाऊनची आवश्यकता आहे की नाही? यावर जाणकार मंडळीच भाष्य करू शकतील. पण लोकांची रोजीरोटी चालू राहिली पाहिजे. कोणाचाही रोजगार न बुडता निर्बंध आणले गेले पाहिजेत. तरीही लॉकडाऊन लादले गेल्यास उत्पन्नाचे साधनच बंद होऊ शकते. त्यामुळे मग जगायचे कसे? असाही यक्ष प्रश्न असल्याचे अन्य एका पदाधिकाऱ्याने उपस्थित केला आहे. यावर अवलंबून असलेले शेकडो कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच हॉटेल मालक आणि चालक अशा सर्वांचेच यात मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा होण्याची भीतीही हे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. मग विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर, मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई जरूर झाली पाहिजे, असेही ते सांगतात.
लॉकडाऊन होऊ नये यासाठी सध्या काही अपवाद वगळता हॉटेल व्यावसायिकांकडून काटेकोरपणे नियमांचे पालन केले जात आहे. यासाठी पालिका आणि पोलीस यंत्रणांनीही आणखी मोठी मोहीम उघडली पाहिजे. त्याला नागरिकांनीही प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. नियम आणखी कडक केले जावेत. तसेच जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जावी, असा सल्लाही शेट्टी यांनी दिला आहे.