अंगठेबहाद्दरांच्या फौजेने कशी होणार महासत्ता?
By संदीप प्रधान | Published: May 13, 2024 10:34 AM2024-05-13T10:34:25+5:302024-05-13T10:35:24+5:30
अंगठाबहाद्दरांची फौज घेऊन देश ना विकसित राष्ट्र होईल ना विश्वगुरू. मात्र याबद्दल प्रचारात अवाक्षर नाही हेच आपले दुर्दैव आहे.
संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक
केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियानात ठाणे जिल्ह्यातील १५ ते ६६ वयोगटातील १३ हजार ७७ निरक्षर पुरुष, महिला, मुले, मुली साक्षर झाले. ही सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कोलाहलात फारशी कुणाच्या कानात न शिरलेली बातमी आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत १७ मार्च २०२४ रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल लागला. अन्य जिल्ह्यांत असेच अनेक जण उत्तीर्ण झाले असतील. निवडणूक आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांचे व नेत्यांचे कोट्यवधी रुपये या जुगारात लागल्यामुळे आता अनेकजण एकेरीवर आले आहेत. त्यांचे हे वर्तन त्यांनी प्रतिज्ञापत्रात दावा केलेल्या पदव्यांच्या विपरीत आहे. अशिक्षितेसारख्या मूलभूत प्रश्नावर बोलायला उमेदवार व नेत्यांना फुरसत नाही. मात्र भारत २०४७ साली किंवा त्यापूर्वी जर विकसित राष्ट्र व्हावा, असे वाटत असेल तर अशिक्षिततेच्या अंधाऱ्या गुहेत चाचपडत असलेल्या या जनतेला जलद गतीने शिक्षणाचा प्रकाश दाखवावा लागेल.
ठाणे जिल्हा हा तुलनेने बराच प्रगत जिल्हा आहे. येथील ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर वगैरे शहरी भाग आहे. येथे मॉल, मल्टिप्लेक्सपासून हॉटेल, पब आहेत. या शहरी भागातही काही अंशी निरक्षर असू शकतात. शहरी भागाला खेटूनच ग्रामीण भाग आहे. मुरबाड, शहापूर वगैरे परिसरात आदिवासी पाडे आहेत. तेथे निरक्षरांची संख्या अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या परीक्षेत १० हजार २४८ महिला उत्तीर्ण झाल्या, ही सर्वांत समाधानाची बाब आहे. घरातील महिलेस अक्षर ओळख झाली, ती शिकली तर घरातील मुले, मुली नक्की शिकणार. शिक्षण नसल्याने भिवंडी, मुरबाड, शहापूर किंवा शेजारील पालघर जिल्ह्यात वीटभट्टीवर आठवड्याला जेमतेम ५०० रुपये रोजगारावर वीटभट्टी मजुरांना वेठबिगार म्हणून राबवले जाते. त्यांच्या कुटुंबातील महिला, मुलींचे शोषण केले जाते.
विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखालील श्रमजीवी संघटनेने काही प्रकरणात कारवाई करण्यास भाग पाडले आहे. परंतु जोपर्यंत आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत नाही तोपर्यंत आपले शोषण होत असल्याचे त्यांच्या लक्षात येणार नाही.
भोंदूगिरी करणाऱ्यांकरिता असा अशिक्षित वर्ग ही मोठी ‘बाजारपेठ’ आहे. ‘पुढे पोलिस आहेत त्यामुळे अंगावरील दागिने काढून कागदाच्या पुडीत ठेवा’, असे सांगून फसवणूक होणारे वृद्ध हे बहुतांशी अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असतात. आता तर उच्चशिक्षित लोकांचीही सायबर ठगांकडून फसवणूक होतेय. देशाने २०४७ पूर्वी विकसित राष्ट्र व्हावे असे वाटत असेल तर अशिक्षितता संपवणे हाच मार्ग असू शकतो. अंगठाबहाद्दरांची फौज घेऊन देश ना विकसित राष्ट्र होईल ना विश्वगुरू. मात्र याबद्दल प्रचारात अवाक्षर नाही हेच आपले दुर्दैव आहे.