अनधिकृत बांधकामांचे दुष्टचक्र कसे भेदायचे?
By संदीप प्रधान | Published: March 13, 2023 09:17 AM2023-03-13T09:17:01+5:302023-03-13T09:17:49+5:30
ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत.
संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक
ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत. ही बांधकामे स्थानिक माफिया कम राजकीय नेत्यांनी उभी केलेली आहेत. ती पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र ती पाडण्यास त्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांबरोबरच ती उभी करणाऱ्या राजकीय माफिया नेत्यांचा विरोध आहे. गेल्या काही दिवसांत अनधिकृत बांधकामांमधील नोकरशाहीचे हितसंबंध यावर प्रकाश पडला. अनधिकृत बांधकाम विभागाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर या संदर्भात गंभीर आरोप झालेले आहेत.
मुंबईतील गिरण्यांच्या जमिनी निवासी व व्यापारी वापराकरिता खुल्या झाल्यावर बांधकाम क्षेत्रात बूम आला. जागांचे दर गगनाला भिडले. मुंबईत मोठ्या संख्येने बांधकामे सुरू झाली. जुन्या चाळी, भाड्याच्या इमारती यांमध्ये वास्तव्य करणारा मराठी मध्यमवर्ग आर्थिक गरजांमुळे व कुटुंब वाढल्याने ठाणे जिल्ह्यातील शहरांकडे सरकला. नेमका याच संधीचा गैरफायदा ठाणे जिल्ह्यातील जमीनमालक, स्थानिक माफिया (जे पुढे बरेचसे राजकारणात आले) व नोकरशहा यांनी घेतला. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. ठाण्यात शिवसेनेने बस्तान बसवले होते; तर डोंबिवली-कल्याण व आजूबाजूच्या परिसरात जनसंघाचे वर्चस्व होते. आदिवासी पट्ट्यात वनवासी कल्याण आश्रमाचे काम आहे. त्यामुळे कदाचित येथे आपले फारसे मतदार नाहीत, या आकसापोटी असेल; पण काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी ठाणे जिल्ह्याचा विकास हा भूमाफिया व भ्रष्ट नोकरशहा यांच्या हाती सोपवून दिला. त्यातून मग येणाऱ्या लोंढ्यांकरिता मिळेल तिथे, मिळेल तशा इमारती उभ्या केल्या गेल्या. मुंबईतून जागा विकून आलेल्यांकडे चार पैसे असल्याने त्यांनी मागेपुढे न पाहता घरे घेतली. कालांतराने आपण राहत असलेल्या इमारती बेकायदा असल्याचा साक्षात्कार अनेकांना झाला. अनधिकृत बांधकामांची प्रकरणे न्यायालयात गेली. वेळोवेळी कारवाईचे आदेश झाले. मामुली कारवाई झाली; पण पुढे काहीच झाले नाही. यामुळे ठाणे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर अशा शहरांत असंख्य बांधकामे उभी आहेत.
नाेकरशाही बाबाजींची बटीक
- मुंब्र्यातील अनधिकृत बांधकामांवरून स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड व अनधिकृत बांधकाम विभागाचे सहायक आयुक्त आहेर यांच्यात महापालिका निवडणुकांच्या तोंडावर संघर्षाला तोंड फुटले. तत्पूर्वी ठाणे महापालिकेबाहेर लागलेला फलक हाही त्याच संघर्षाचा परिपाक होता.
- नव्वदच्या दशकात जे. जे. हत्याकांडात सहभाग असलेल्या व उल्हासनगरातील एका वादग्रस्त रिसॉर्टमध्ये त्या हत्याकांडानंतर आसरा घेतलेल्या सुभाषसिंह ठाकूर (बाबाजी) याच्या नावाने धमकावण्याचे प्रकरण धक्कादायक आहे. याची चौकशी झाल्याचे दिसत नाही.
- तुरुंगात असूनही हा बाबाजी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा रिमोट कंट्रोल हातात राखून आहे, हेच स्पष्ट होते. त्यावेळी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा तापला होता. राजकारण्यांबरोबर आता नोकरशाहीदेखील बाबाजींची बटीक झाली आहे. जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांचे दुष्टचक्र कुणाला थांबवायचे नाही, हेच वास्तव आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"