भिकाऱ्यांचे लसीकरण कसे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:39 AM2021-03-10T04:39:17+5:302021-03-10T04:39:17+5:30

अजित मांडके ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, याच जिल्ह्यात रस्त्यावर, मंदिराशेजारी, ...

How will the beggars be vaccinated? | भिकाऱ्यांचे लसीकरण कसे होणार

भिकाऱ्यांचे लसीकरण कसे होणार

Next

अजित मांडके

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, याच जिल्ह्यात रस्त्यावर, मंदिराशेजारी, फुटपाथवर, रेल्वेत, सिग्नलवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांचे लसीकरण कसे करायचे, असा पेच शासकीय यंत्रणांपुढे निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे ना धड पॅनकार्ड ना आधारकार्ड, मग नोंदणी कशी करायची, लस कशी द्यायची, असा पेच निर्माण झाला आहे. परंतु, या संदर्भात काहीतरी तोडगा काढावा लागेल, असे जिल्हा यंत्रणा सांगत आहे.

जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षे वयोगटापुढील मात्र त्यांना काही आजार असल्यास त्यांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरण करताना आधारकार्ड आणि पॅनकार्ड आवश्यक पुरावा म्हणून मागितला जात आहे. त्यानंतरच लसीकरण केले जात आहे. परंतु, ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात आज शेकडो भिकारी सिग्नलवर, फुटपाथवर, रस्त्याच्या कडेला, मंदिराबाहेर भीक मागताना दिसत आहेत. या भिकाऱ्यांसाठी ठाण्यात एक शेल्टर होम बांधले आहे, तर जिल्हा यंत्रणाच्या माध्यमातून जांभूळगाव येथे एक शेल्टर होम आहे. त्याठिकाणी ७४ भिकारी वास्तव्यास आहेत. यामध्ये ठाण्याच्या शेल्टरमध्ये २० आणि जांभूळगाव येथील शेल्टरमध्ये ५४ जणांचे वास्तव्य आहे, तर जिल्ह्यात आजडीला सुमारे ३०८ भिकारी असल्याची माहिती जिल्हा यंत्रणेच्या वतीने देण्यात आली. या भिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्याने त्यांचे लसीकरण कसे होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

-आधारकार्ड नाही त्यांचे लसीकरण कसे होणार

जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने जांभळूगाव येथे असलेल्या शेल्टर होममध्ये असलेल्या भिकाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठीचे नियोजन केले आहे. परंतु, जिल्ह्यात बेवारसपणे फिरत असलेल्या भिकाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून त्यांना सुरुवातीला पकडावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना एका छताखाली आणावे लागणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनाकडे या संदर्भात चर्चा करून त्यांना कशाप्रकारे लसीकरणाच्या प्रक्रियेत आणले जाईल, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्यासाठी या यंत्रणा तयार होणार का? हाच खरा प्रश्न आहे.

ठाण्यात बेवारस नागरिकांची संख्या अधिक

ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत बेवारस नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यातही ठाण्यात आजघडीला २०१८ मध्ये केलेल्या सर्व्हेत १५८ भिकारी असल्याची नोंद आहे, तर कल्याण, डोंबिवलीत ६७, उल्हासनगर ५६ आणि भिवंडीत ६७ भिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील एकूण भिकारी ३०८

बेघर निवाऱ्यात राहणाऱ्यांची संख्या

ठाणे - २० - पुरुष १६, ४ स्त्री

जांभूळगाव - ५४ - सर्व पुरुष

बेवारसपणे फिरणाऱ्या भिकाऱ्यांना लसीकरण करण्यासाठी आधी त्याचे नियोजन आखावे लागणार आहे. यासाठी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची मदत घेऊन या भिकाऱ्यांना पकडून त्यांना शेल्टरमध्ये आणावे लागणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी, महापालिका यंत्रणा यांच्याशी चर्चा करून पत्रव्यवहार करून भिकाऱ्यांना लसीकरण कसे करता येऊ शकते, याची मोहीम हाती घ्यावी लागणार आहे.

-महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

Web Title: How will the beggars be vaccinated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.