... तरी भाजपा पूर्ण बहुमतापासून दूरच

By admin | Published: February 24, 2017 07:45 AM2017-02-24T07:45:44+5:302017-02-24T07:45:44+5:30

उल्हासनगर पालिकेत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने गुन्हेगारांना सोबत घेत सत्तेची गणिते मांडली

However, the BJP is far from complete majority | ... तरी भाजपा पूर्ण बहुमतापासून दूरच

... तरी भाजपा पूर्ण बहुमतापासून दूरच

Next

पंकज पाटील / उल्हासनगर
उल्हासनगर पालिकेत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने गुन्हेगारांना सोबत घेत सत्तेची गणिते मांडली. अनेकांचा विरोध पत्करून भाजपाने टीम ओमी कलानीला सोबत घेतले. हे करण्यामागे भाजपाची एकच इच्छा होती, ती पूर्ण बहुमताची. टीम ओमी कलानीसोबतची मैत्री निकालात भाजपाला फायद्याची ठरली, तरी या मैत्रीमुळे भाजपाला एकहाती सत्ता मात्र मिळवता आली नाही. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांची गरज भासणार आहे. दुसरीकडे रिपाइंला सोबत घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेल्या शिवसेनेला या निवडणुकीत फायदा झाला असला, तरी सत्तेपासून तेदेखील दूर राहिले आहेत. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने शिवसेना आणि भाजपा या दोघांनाही सत्तेसाठी इतर पक्षांना आपल्याकडे वळवण्याची वेळ आली आहे.
उल्हासनगर पालिका निवडणुकीत भाजपाने ओमी कलानी आणि त्यांच्या टीमची साथ घेतल्याने भाजपाविरोधात इतर पक्षांनी मोर्चेबांधणी केली. शिवसेनेला शहाड, गोलमैदान परिसर या भागासह उल्हासनगर-४ आणि ५ मध्ये चांगला प्रतिसाद लाभेल, ही अपेक्षा होती. तशी साथ मतदारांनी शिवसेनेला दिलीही. पॅनल क्रमांक-१९ मध्ये शिवसेनेला चांगली संधी असली, तरी ऐनवेळी शिवसेनेत आलेले नगरसेवक विजय पाटील आणि मीना सोंडे यांनी थेट उमेदवारी धोक्यात येणार, या भीतीने भाजपात प्रवेश करून त्या ठिकाणी उमेदवारी मिळवली. हक्काचे दोन नगरसेवक भाजपात गेल्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला. त्याचवेळी या दोघांनी आपल्या प्रभागात स्वत:सह इतर दोन उमेदवारांनादेखील विजयी करत संपूर्ण पॅनलवर वर्चस्व निर्माण केले. हक्काच्या दोन जागा आणि संपूर्ण पॅनल गमावण्याची वेळ सेनेवर आली.
शिवसेनेला बसलेला मोठा फटका ज्येष्ठ नगरसेवक भुल्लर महाराज यांच्या पॅनलमध्ये. भुल्लर महाराज यांचा प्रभागातील दबदबा लक्षात घेता या पॅनलवर सेनेचेच वर्चस्व राहील, असा विश्वास होता. त्यांनी आणि पत्नी चरणजितकौर यांनी विजय खेचला असला, तरी त्याच पॅनलमधील शिवसेनेचे दोन उमेदवार पराभूत झाले. तेथे भाजपाच्या आशा बिराडे आणि रवींद्र बागुल यांनी विजय मिळवला. पॅनल क्रमांक-६ मध्येही शिवसेनेला कामगिरी बजावता आली नाही. या ठिकाणी चारही जागा भाजपाने जिंकत शिवसेनेला मागे टाकले; तर, शिवसेनेचे उल्हासनगर शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्या पॅनलमध्येदेखील एक जागा शिवसेनेला गमवावी लागली. या ठिकाणी रवींद्र दवणे यांनी विजय मिळवत संपूर्ण पॅनल जिंकण्याचे सेनेचे स्वप्न भंग केले.
पॅनल क्रमांक-५ मध्येही शिवसेनेला वर्चस्व निर्माण करता आले नाही. तेथे माजी आमदार कुमार आयलानी यांची पत्नी मीना यांच्यासह इतर तीन उमेदवारांनी विजय मिळवत शिवसेनेला खाते उघडण्याची संधीही दिली नाही. विधानसभा निवडणुकीत ज्या प्रभागात शिवसेनेला सर्वाधिक मते मिळत होती, त्या पॅनल क्रमांक-१८ मध्ये पक्षाला खातेही उघडता आले नाही. या पॅनलमधील उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी सर्वस्वी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, या तेथेही शिवसेनेला पकड घेता आली नाही. येथे भाजपाचे राजेश वानखेडे, भारिपच्या कविता बागुल, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमोद टाले आणि काँग्रेसच्या अंजली साळवे यांनी विजय मिळवत शिवसेनेची प्रगती रोखली.
पॅनल क्रमांक-२० हा देखील सेनेसाठी सोपा होता. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यावरून झालेला वाद आणि पाटील घराण्यातील संघर्षाचा फटका शिवसेनेला बसला. येथे तीन जागा अपेक्षित असताना आकाश आणि विकास पाटील या दोघा बंधंूनी विजय मिळवला. तरी त्या ठिकाणी एक जागा भाजपाच्या कविता गायकवाड यांना गेली.
भाजपालाही काही प्रभागात साजेशी कामगिरी जमलेली नाही. प्रभाग क्रमांक-१७ मध्ये भाजपाची लढत राष्ट्रवादीसोबत होती. मात्र, त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या भरत गंगोत्री आणि त्यांच्या इतर तीन उमेदवारांनी चारही जागा जिंकत भाजपाला या प्रभागात संधीच दिली नाही. मराठी वस्तीत भाजपाला अपेक्षित कामगिरी बजावलेली नाही. प्रभाग ९ भाजपासाठी महत्त्वाचा होता येथे भाजपाच्या दोन उमेदवारांसह ओमी कलानी यांचे निकटवर्तीय मनोज लासी यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, भाजपाच्या चिन्हावर न लढल्याने ते पराभूत झाले.



भाजपाला सत्तेपर्यंत नेण्यात ओमी टीम अपयशी

उल्हासनगर : महापालिकेची एकहाती सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपने शिवसेनेऐवजी ओमी कालानी टीमला राष्ट्रवादीतून फोडून त्यांच्याशी आघाडी केली. ही टीम आणि पक्षाच्या ३५ विद्यमान नगरसेवकांना रिंगणात उतरवूनही भाजपाला ३३ नगरसेवकांपर्यंतच मजल मारता आली. ज्यांच्या भरवशावर हे राजकारण केले, ती ओमी टीम भाजपाला सत्तेपर्यंत घेऊन जाण्यात अपयशी ठरली.
वादग्रस्त पप्पू कलानी यांचा वादग्रस्त मुलगा ओमी यांना त्यांच्या टीमसह आघाडी करत आणि नंतर मागल्या दाराने प्रवेश देत पक्षात घेतल्याने भाजपावर राज्यभरातून टीका झाली. ती सहन करूनही स्वबळाच्या सत्तेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत नसल्याने भाजपाच्या गोटात भयाण शांतता आहे. गेल्या वेळी भाजपाचे ११ तर राष्ट्रवादीचे २१ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादीतील बहुतांश नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेत ओमी यांनी आपल्या टीमची स्थापना केली. या टीमचे फक्त १८ नगरसेवक निवडून आले. भाजपने ओमी टीमसोबत आघाडी करूनही स्वबळाच्या सत्तेचे स्वप्न साकार झाले नाही. याउलट ओमी टीमने विद्यमान २० पेक्षा जास्त नगरसेवकांना तिकिट दिले होते. त्यातील १८ नगरसेवक निवडून आणण्यात त्यांना यश आले. भाजपावर नाराज असल्याने सेनेसोबत गेलेल्या रिपाइंच्या आठवले गटाला युती करून फायदा होण्याऐवजी नुकसान सहन करावे लागले. यात काँगे्रसचा धुव्वा उडाला असून अंजली साळवे या एकमेव नगरसेविका निवडून आल्या आहेत, तर फुटीच्या धक्कयातून सावरत राष्ट्रवादीने चार नगरसेवक निवडून आणले. बसपा, मनसे व अपक्ष यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही.

Web Title: However, the BJP is far from complete majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.