सत्ता सेनेची मात्र तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:38+5:302021-06-17T04:27:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना स्थायी समिती सभापतीपद भाजपकडे गेल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. भाजप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना स्थायी समिती सभापतीपद भाजपकडे गेल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. भाजप आमदार रवींद्र चव्हाण व उपमहापौर भगवान भालेराव हे किंगमेकर ठरले असून शिवसेनेचे राजकीय डावपेच स्थायी समितीमधील कट्टर भाजप सदस्यांमुळे अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना महापौर निवडणुकीत भाजपतील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेच्या लीलाबाई अशान व रिपाइंचे भगवान भालेराव यांना मतदान करून महापौर व उपमहापौरपदी निवडून आणले. कलानी कुटुंबातील एका सदस्याला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देतो असा शब्द देऊनही तो भाजपने पाळला नाही. या निषेधार्थ भाजपमधील ओमी टीम समर्थक नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप डावलून शिवसेनेच्या अशान यांना मतदान केल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी त्यावेळी दिली होती. महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यावर, गेल्यावर्षी स्थायी समिती सभापतीपद स्वतःकडे ठेवण्यात शिवसेनेला यश आले होते. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे मात्र भाजपचे स्थायी समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक व अनुमोदन देऊन स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेने निवडून आणले होते. तसेच भाजपचे समिती सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांना सभापती निवडणुकीपूर्वी सदस्यपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले होते.
दरम्यान, स्थायी समिती सभापतीपदासाठी रिपाइंचे गटनेते, उपमहापौर भगवान भालेराव इच्छुक होते; मात्र शिवसेनेने नकार घंटा दिल्यावर, त्यांनी भाजप आघाडीत जाऊन सभापतीपद मला नाहीतर, शिवसेनेला नाही असा पवित्रा घेतला. तसेच स्थायी समितीमध्ये कट्टर नगरसेवक पाठविण्याचा सल्ला भाजप नेत्यांना दिला. गेल्या सभापतीपदाच्या पराभवाचे उष्टे काढण्यासाठी आमदार चव्हाण, भालेराव, आमदार कुमार आयलानी यांनी स्थायी सदस्यांना एका आठवड्यापूर्वीच भूमिगत केले होते. त्यामुळे शिवसेनेला राजकीय डावपेच आखता आले नाहीत.
चौकट
शहर विकासासाठी भाजप कटिबद्ध
भाजप शहर विकासासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आमदार रवींद्र चव्हाण व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. तसेच यापुढे भाजपातून फुटेल अशा कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश नाही असा इशाराही चव्हाण यांनी दिला. भालेराव यांनीही सभापती भाजपचाच निवडून येणार होता असा दावा केला होता.
------------------------------------
तेथेच शिवसेनेचे गणित चुकले?
महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना आघाडीसोबत असलेले रिपाइंचे गटनेते व उपमहापौर भगवान भालेराव यांनी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वी भाजप आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेथेच शिवसेनेचे गणित बिघडल्याने स्थायी समिती सभापतीपद हातून गेले. भालेराव भाजपसोबत आल्याने राजकीय बळ मिळाल्याचे बोलले जाते. महापालिका निवडणुकीत असेच राजकीय गणित राहिल्यास शिवसेना आघाडीला सत्तेसाठी मोठी मजल मारावी लागणार आहे.