बारावीची परीक्षा मंगळवारपासून; जिल्ह्यातून ९६ हजार १८१ विद्यार्थी
By admin | Published: February 25, 2017 03:04 AM2017-02-25T03:04:27+5:302017-02-25T03:04:27+5:30
ठाणे, पालघर जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ८२६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. २८ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहे.
ठाणे : ठाणे, पालघर जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ८२६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. २८ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहे. तत्पूर्वी ठिकठिकाणी सुमारे १७ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारीला संपणार आहेत.
या प्रात्यक्षिक परीक्षा ठाणे जिल्ह्यातील १४८ केंद्रांवर तर पालघर जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर घेण्यात आल्या. यासाठी प्रत्येकी एक केंद्र संचालक व परीक्षकांच्या नियंत्रणात या दोन्ही जिल्ह्यात प्रात्यक्षिक पार पडले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी १२ वीची परीक्षा २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे
या परीक्षेसाठी कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसी या शाखांचे एक लाख ३३ हजार ८२६ परीक्षार्थी या दोन्ही जिल्ह्यातील आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यामधील ९६ हजार १८१ विद्यार्थी आहेत. यामध्ये कला शाखेचे १६ हजार ५९२, विज्ञानचे २९ हजार ४५०, वाणिज्यचे ४९ हजार ०५७ आणि एक हजार ८२ विद्यार्थी एमसीव्हीसी शाखेचे आहेत. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यामधील १६ हजार ६७९ वाणिज्य शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत, कलेचे दहा हजार ९३७, विज्ञानचे नऊ हजार ४८५ आणि एमसीव्हीच्या केवळ ५४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)