मुंब्य्रात नव्या वर्षात होणार शासकीय कार्यालयांचे हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 03:41 AM2017-12-29T03:41:43+5:302017-12-29T03:41:55+5:30
ठाणे / मुंब्रा : अनधिकृत बांधकामे, धोकादायक इमारती आणि अनेक समस्यांच्या गर्तेत असलेल्या मुंब्य्रात येत्या काळात एकाच छताखाली म्हणजेच एकाच इमारतीत शासकीय कार्यालयांचे जाळे उभारले जाणार आहे.
अजित मांडके, कुमार बडदे
ठाणे / मुंब्रा : अनधिकृत बांधकामे, धोकादायक इमारती आणि अनेक समस्यांच्या गर्तेत असलेल्या मुंब्य्रात येत्या काळात एकाच छताखाली म्हणजेच एकाच इमारतीत शासकीय कार्यालयांचे जाळे उभारले जाणार आहे. त्यामुळे मुंब्य्राची ओळख शासकीय कार्यालयांचे हब अशी होणार आहे. नव्या वर्षात आता या इमारतीच्या बांधकामाचा नारळ फुटणार आहे.
खाडीपलीकडील शहर अशी मुंब्य्राची ओळख आहे. अनेक समस्यांच्या गर्तेत ते अडकलेले आहे. परंतु, मागील काही वर्षांत मुंब्य्रातही बदल होऊ लागले आहेत. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू झाले आहे. तसेच येथील रस्तेदेखील काँक्रिटचे होऊ लागले आहेत. फेरीवालामुक्त मुंब्रा स्टेशन झाले आहे. परंतु, धोकादायक आणि दाटीवाटीने वसलेल्या इमारतींचे जाळे येथून काही हललेले नाही. असे असले तरी येथील रहिवाशांना एखादे शासकीय काम करावयाचे झाल्यास त्यासाठी एक ते दीड तासाचा प्रवास करून ठाणे गाठावे लागते. ते काम त्याच दिवशी होईल, याची शाश्वतीही त्यांना नसते. खराब रस्ते, रेल्वेची गर्दी यामुळे येथील ते मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच शासकीय कार्यालयेच मुंब्य्रात आली, तर किती बरे होईल, अशी आशा येथील रहिवाशांनी व्यक्त केली होती. त्यानुसार, स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार, दोन वर्षांपूर्वी मुंब्रा पोलीस स्टेशनसमोरील बाहुबली जैन ट्रस्ट येथील जागेवर त्यांनी शासकीय कार्यालयाचे आरक्षण टाकून घेण्यासाठी पत्रव्यवहार केल्यावर पालिकेने यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. शासनानेदेखील आता येथे शासकीय कार्यालये उभारण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे मोठा अडथळा दूर झाला असून नव्या वर्षात आता या कामाचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
सुमारे दोन एकर जागेत हे १२ मजली शासकीय कार्यालयांचे हब उभारले जाणार असून त्याचा आराखडा तयार असून डिझाइन तयार करण्याचे काम आता हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ५० कोटी ६५ लाख ६८ हजार ३७२ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
>जानेवारीत इमारतीच्या बांधकामाला सुरूवात
१२ मजल्यांच्या या इमारतीत एकाच छताखाली पोलीस ठाणे, प्रभाग समिती कार्यालय, अग्निशमन दल, तलाठी कार्यालय, महावितरणचे कार्यालय, पोस्ट आॅफिस आदींसह इतरही शासकीय कार्यालये येथे असणार असून कॅन्टीनचादेखील समावेश असणार आहे. एकाच इमारतीत सर्व शासकीय कामे होणार असल्यामुळे येथील रहिवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. इमारत बांधण्याच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाला आगामी जानेवारी महिन्यात सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेने दिली.मागील दोन वर्षांपासून यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. परंतु, आता खºया अर्थाने हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.
- जितेंद्र आव्हाड,
आमदार, राष्ट्रवादी