'त्या' मोदी आणि 'या' मोदीमध्ये फरक आहे...! उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 02:46 PM2018-10-24T14:46:42+5:302018-10-24T14:47:21+5:30
ठाण्यात महापालिकेच्या सय्यद मोदी अकादमीच्या 30 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.
ठाणे : आज आम्ही एका अकादमीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. उद्या सर्व वृत्तपत्रांमध्ये हेडिंग असेल की, केतकर आणि उद्धव ठाकरे मोदीच्या प्रशिक्षण अकादमीला जावून आले. पण 'त्या' मोदी आणि 'या' मोदीमध्ये फरक आहे, अशी कोटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात केली.
ठाण्यात महापालिकेच्या सय्यद मोदी अकादमीच्या 30 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी अकादमीसाठी विविध सुविधा देण्याची मागणी केली. यावेळी ठाकरे म्हणाले की, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे या मागण्या पूर्ण करतीलच पण मी आज सांगतो या मागण्या पूर्ण झाल्या. ठाण्यातील मोदी अकादमी आणि आणि ती अकादमी वेगळी आहे. या अकादमीचा आम्हाला अभिमान आहे. या अकादमीसाठी जे काही करता येईल ते करू, असेही ठाकरे म्हणाले.
या अकादमीने ऑलिंम्पिक मेडल मिळवावे. ते महाराष्ट्रासाठी, ठाण्यासाठी अभिमानाचे असेल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बॅक हँडचा प्रकार मला खेळात आणि राजकारणात जमलाच नाही
इथे काही जण आहेत. आता त्यांना कळले ते कसे मोठे झाले. सगळे माझ्याबरोबर खेळलेत. त्यामुळे त्यांना कळले की वाईट कसे खेळले जाते. मी त्यांना शिकवले नाही. हे सगळे माझ्यासाठी वेळ काढून यायचे. बऱ्याचदा शिकवायचा प्रयत्न करायचे पण मला बॅक हँड काही जमला नाही. खेळातच नाही, राजकारणातही जमला नसल्याची प्रांजळ कबुली ठाकरे यांनी दिली आणि सभागृहात एकच हशा पिकला.