ठाण्यात यशोधननगर भागात गॅस वाहिनीला भीषण आग: सुदैवाने जिवित हानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:48 PM2020-06-02T23:48:16+5:302020-06-02T23:54:43+5:30
यशोधननगर भागातील रुणवाल प्लाझा इमारतीजवळ महानगर गॅसची वाहिनीतून गळती होऊन याठिकाणी मंगळवारी दुपारी मोठी आग लागली होती. ठाणे अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या पथकाने अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नातून या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: यशोधननगर भागातील रुणवाल प्लाझा इमारतीजवळ असलेल्या उद्यानातील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे महानगर गॅसची वाहिनीतून गळती होऊन याठिकाणी मंगळवारी दुपारी मोठी आग लागली होती. ठाणे अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या पथकाने अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नातून या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.
यशोधननगर येथे कोरस टॉवर संकुलाच्या मागील बाजूला असलेल्या एका उद्यानात ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही कामासाठी काही दिवसांपूर्वी एक मोठा खड्डा खोदला होता. या खड्डयात पालापाचोळयांचा मोठा कचरा भरला गेला होता. या कच-याला २ जून रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने मोठे स्वरुप धारण केल्यामुळे या खड्डयामध्येच खाली असलेली महानगर गॅसची वाहिनी गरम होऊन अर्धा एमएम फुटली. त्यातून गॅस बाहेर आल्यामुळे आगीने एकदम रौद्र रुप धारण केले. ही माहिती मिळतातच ठाणे महापालिकेचे वागळे इस्टेट अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महानगर गॅसच्या शीघ्रकृती दलानेही तातडीने धाव घेतली. एका बाजूने अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तर दुसºया बाजूने महानगर गॅसचे प्रभारी जिल्हा प्रमुख नितीन पेडणेकर यांच्या पथकाने त्याच भागात असलेला गॅस पुरवठा बंद केला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच ही आग आटोक्यात आली. यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी जमा झाली होती. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, निरीक्षक संतोष घाटेकर आणि ठाणे महापालिकेचे शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
‘‘ रुणवाल प्लाझासमोर असलेल्या कच-यामुळे ही आग लागली. तातडीने गॅस पुरवठा बंद केल्यानंतर आगीवर नियंत्रण आले. या भागात २५ ते ३० घरांसाठीचा गॅस काही काळ बंद केला होता. तो आता पूर्ववत केला आहे.’’
नितीन पेडणेकर, जिल्हा प्रभारी अधिकारी, महानगर गॅस, ठाणे