‘रक्ताचं नातं’ मोहिमेला उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:49+5:302021-07-15T04:27:49+5:30
ठाणे : लोकमत आणि रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१४२ तर्फे सुरू असलेल्या रक्तदान मोहिमेत १,४५४ युनिट रक्त संकलित करण्यात आले. ''लोकमत ...
ठाणे : लोकमत आणि रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१४२ तर्फे सुरू असलेल्या रक्तदान मोहिमेत १,४५४ युनिट रक्त संकलित करण्यात आले. ''लोकमत रक्ताचं नातं'' आणि रोटरॅक्टच्या ड्रॉप ऑफ होप या मोहिमेला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ''लोकमत रक्ताचं नातं''च्या साहाय्यामुळे खूपच फायदा झाला. लोकमतमुळे आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता आले, अशा भावना रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१४२ने व्यक्त केल्या.
कोविडचा प्रादुर्भाव असल्याने सर्वत्र निर्बंध आहेत. रक्ताची कमतरता आणि त्यामुळे थैलेसीमियाच्या रुग्णांना सहन करावा लागणारा त्रास, हे लक्षात घेऊन सुष्मिता वलेचा भाटिया, महानंद विश्वकर्मा, सृष्टी यशवंते, मानसी कंटे, मितेश जैन आणि प्रीती नाडर यांचा समावेश असलेले रोटरॅक्ट ३१४२चे जिल्हा समाज सेवा दल यांनी या प्रकल्पात स्वतःला झोकून दिले. तसेच, विविध युनिट्समधील अनेक तरुण, तरुणी शिबिरांमध्ये स्वयंसेवक म्हणून उभे राहिले. कोरोनाची भीती असूनही लोकांनी शिबिरामध्ये येऊन रक्तदान केले. एकूण १,४५४ युनिट रक्त जमा केल्यामुळे आमच्या प्रकल्पाला भव्य यश मिळाल्याचे समाधान आम्हाला मिळाले, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर अशा सर्व ठिकाणी रक्तदात्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. या शिबिरासाठी रोटरॅक्टच्या नीरव खेतवानी, अथर्व आगवन, महानंद विश्वकर्मा, मानसी कांटे, चिन्मय प्रधान, ऋषिकेश भदाणे, निरजीत राजा, हिमांशु दापूरकर, प्रमुग्धा वेंकटेशा, रिषभ अहलुवालिया, गुरणीत सायनी या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.