लहानग्यांच्या ऑनलाइन वाचक कट्ट्याला उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:32+5:302021-05-22T04:36:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : हौशी महिला वाचकांनी इंटरनेटच्या युगात कोविड काळात केवळ लहान मुलांसाठी एकत्र येऊन ऑनलाऊन वाचन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : हौशी महिला वाचकांनी इंटरनेटच्या युगात कोविड काळात केवळ लहान मुलांसाठी एकत्र येऊन ऑनलाऊन वाचन कट्ट्याचा आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या कट्ट्याची सुरुवात झाली. वेंगुर्ला, खेड, डोंबिवली, ठाणे, पुणे, अंबरनाथ, दिवा अशा विविध शहरांमधून मुलांचा या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला.
धनश्री दांडेकर, मानसी वाळुंजकर आणि दीप्ती लेले या महिला ऑनलाइनच एकत्र आल्या आणि मुलांना विरंगुळा, मनोरंजन यातून वाचनाची आवड व्हावी, या उद्देशाने हा कट्टा सुरू केला आहे. आतापर्यंत या कट्ट्यावर ४० मुला-मुलींनी सहभाग दर्शवला असून, त्यांचे लहान आणि मोठा असे गट तयार करण्यात आले आहेत. चौथी ते सहावी आणि सातवी ते नववी अशी ग्रुपची विभागणी आहे. सध्या एक दिवसाआड उपक्रम सुरू असून, लवकरच दुसरी बॅच सुरू करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हल्ली मुलांना वेगवेगळे क्लास लावून ऑलराऊंडर बनवण्याचा पालक प्रयत्न करत असतात. बहुतांशी ते साध्य होतातही; पण बरेचदा संकल्प करूनही प्रत्यक्ष कृतीत न येणारी गोष्ट म्हणजे नियमित वाचन. मुलांची आणि पालकांची हीच गरज लक्षात घेऊन या वेगळ्या उपक्रमाची सुरुवात या वाचकप्रेमींनी केल्याचे वाळूंजकर यांनी सांगितले.
या वाचन कट्ट्यावर मुलांनी त्यांच्याकडील कविता, बोधकथा, ऐतिहासिक कथा आणि रामायण, महाभारतातील विविध कथा यांचे वाचन करायचे असते. त्यांच्या वाचनातील सुधारणासुद्धा या कट्ट्यावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासोबतच मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा हाच प्रामाणिक हेतू या वाचन कट्ट्याचा आहे. बाल वाचकांना या वाचन कट्ट्यावर यायचं असल्यास अवश्य संपर्क साधावा, त्याना एकत्र येण्याची इंटरनेट लिंक शेअर केली जाईल, असे आवाहन महिला पालकांनी केले आहे.
-----------
फोटो आहे.