कल्याण शीळ रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:45 AM2021-08-17T04:45:41+5:302021-08-17T04:45:41+5:30
कल्याण : कल्याण शीळ रोडवर होत असलेल्या प्रचंड वाहतूककोंडीमुळे नागरिकांचे अक्षरश: हाल होत आहेत. निगरगट्ट प्रशासनामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक होत ...
कल्याण : कल्याण शीळ रोडवर होत असलेल्या प्रचंड वाहतूककोंडीमुळे नागरिकांचे अक्षरश: हाल होत आहेत. निगरगट्ट प्रशासनामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. विधानसभा सुरू नाही. अधिकाऱ्यांना केलेल्या पत्र व्यवहाराला उत्तर मिळत नाही. बैठका लावल्या जात नाहीत. जनतेचे प्रश्न कुणाला सांगायचे, असा सवाल भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, आमदार चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील हे पलावा सिटीत राहत असल्याने, त्यांनाही दररोज या वाहतूककोंडीचा फटका बसत आहे.
कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणचे काम प्रगतिपथावर आहे. काही ठिकाणी रस्ता डांबराचा आहे. हा रस्ता खड्डेमय झाला आहे. विशेषत: जुन्या काटई रेल्वे उड्डाणपुलाची गेल्याच वर्षी दुरुस्ती करण्यात आली. मात्र, याच पुलावर खड्डे पडले आहेत. त्याच्या पुढे लागून पलावा जंक्शन आहे. त्या ठिकाणी वाहतूककोंडी होते. आजही या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. याबाबत आमदार रवींद्र चव्हाण यांनी टीका केली आहे. वारंवार पत्रव्यवहार केला आहे. रस्त्यालगत नैसर्गिक प्रवाह थांबले आहेत. त्यामुळे केलेले रस्त्याचे काम वाहून जाते. अर्ध्या किलोमीटरच्या प्रवासाकरिता ४५ मिनिटांचा वेळ लागतो. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. यात होत असलेल्या दिरंगाईस महाविकास आघाडी जबाबदार आहे.
चौकट-मनसे आमदारांचेही ट्विट
कल्याण-शीळ रस्त्यावरील कोंडीविषयी मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारकडे ट्विट करून प्रशासनाला धारेवर धरले होते. कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीपासून नागरिकांना स्वातंत्र्य कधी मिळेल, सूचना करूनही काही फरक पडत नाही. ठेकेदार टक्केवारी दिल्यामुळे सुस्त आणि वाहतूक पोलीस हप्ते घेण्यात मस्त, अशा शब्दांत त्यांनी घणाघाती टीका केली होती.