मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:07 AM2020-08-21T04:07:24+5:302020-08-21T04:07:33+5:30
गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी गावाला जात असल्याने नेहमीपेक्षा महामार्गावर वाहनांची संख्या अधिक आहे.
पडघा : मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा टोलनाका परिसरात गुरुवारी वाहनचालकांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. सकाळपासूनच महामार्गावर वडपे ते खडवली फाट्यादरम्यान सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.
गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी गावाला जात असल्याने नेहमीपेक्षा महामार्गावर वाहनांची संख्या अधिक आहे. त्यातच तळवली पोलीस चौकी (कल्याणफाटा) येथील क्र ॉसिंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने कोंडी झाल्याचे टोल प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुळात येथे उड्डाणपूल व्हावा, याकरिता अनेकदा स्थानिकांनी आंदोलन केले आहे. मात्र, अद्यापही ही मागणी मान्य झालेली नाही. त्यातच महामार्गावर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच काही वाहनचालकांनी कोंडीतून मार्ग काढण्याकरिता विरु द्ध दिशेने आपली वाहने नेल्याने या कोंडीत अधिकच भर पडली. त्यात दिवसभर सुरू असलेल्या या वाहतूककोंडीत अडकलेल्या तसेच खडवली फाटा ते वडपे या दरम्यान असलेल्या पडघा टोलनाक्यावर कर्मचारी आणि चालकांमध्ये किरकोळ वादही झाले. सहा ते सात किलोमीटरचे अंतर पार करण्याकरिता अडीच ते तीन तास लागत असल्याने वाहचालकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संध्याकाळपर्यंत कोंडी सुटलेली नव्हती.