जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्येच जुंपली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 02:13 AM2018-05-01T02:13:50+5:302018-05-01T02:13:50+5:30
केडीएमसीच्या कारवाईअभावी डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना दुसरीकडे जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्ये हाणामारीच्या घटना सर्रास घडत आहेत.
डोंबिवली : केडीएमसीच्या कारवाईअभावी डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना दुसरीकडे जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्ये हाणामारीच्या घटना सर्रास घडत आहेत. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास येथील इंदिरा चौकात फेरीवाल्यांमध्ये जुंपल्याचे पाहावयास मिळाले. या हाणामारीमध्ये पुरुषांसह एका महिलेचाही समावेश होता.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वेस्थानक परिसरातील १५० मीटरपर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई आहे. परंतु, डोंबिवली पूर्वेतील स्थानक परिसर याला अपवाद ठरला आहे. केडीएमसीच्या कुचकामी ठरलेल्या फेरीवालाविरोधी पथकामुळे मनाई क्षेत्रात बिनदिक्कतपणे फेरीवाल्यांकडून व्यवसाय थाटले जात आहेत. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे या फेरीवाल्यांना पुरते अभय मिळाले आहे. त्यात शहराबाहेरच्या गुंडांच्या आश्रयाने व्यवसाय जोमात सुरू असताना फेरीवाल्यांमध्ये हाणामारीचे प्रसंग सातत्याने घडत आहेत. याआधी पूर्वेकडील स्थानकालगतच्या गल्ल्यांमध्ये फेरीवाल्यांमध्ये आपापसात प्राणघातक हल्लेही झाले आहेत. रामनगर पोलिसांनी या घटना गांभीर्याने घेतल्या नसल्याने हाणामारीचे प्रसंग सुरूच असल्याचे सोमवारी पुन्हा दिसून आले. दुपारी ४ च्या सुमारास जागा मिळवण्यावरून तिघांमध्ये जोरदार मारामारी झाली. यात एक महिलाही होती.
महासभेत वेळोवेळी अशा गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांबाबत चर्चा होऊन वाढत्या अतिक्रमणाबाबत ठोस कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. कर्तव्यात कसूर करणाºयांचे निलंबन करा, असे ठरावही मंजूर झाले आहेत. पण, परिस्थितीत फरक पडलेला नाही.
आयुक्त दखल
घेणार का?
आयुक्त गोविंद बोडके यांनी २५ एप्रिलला डोंबिवली शहराचा दौरा केला होता. त्यावेळी स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना व्यवसाय न करण्याचे ‘फर्मान’ काढण्यात आले होते. परंतु, आयुक्तांची मोटार डोंबिवलीहून कल्याणकडे रवाना होताच फेरीवाले पुन्हा दाखल झाल्याचे दिसले होते. डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत हालचाली प्रशासनाने सुरू केल्या असल्या तरी सध्या सुरू असलेल्या अतिक्रमणाची आयुक्त बोडके गांभीर्याने दखल घेतील का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.