कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात ‘मानवी साखळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:36+5:302021-06-11T04:27:36+5:30
कल्याण : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भरपावसात भूमिपुत्रांनी कल्याण, डोंबिवली व ग्रामीण ...
कल्याण : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भरपावसात भूमिपुत्रांनी कल्याण, डोंबिवली व ग्रामीण भागात मानवी साखळी आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आता हे आंदोलन शांततेने करीत आहोत. परंतु, या पुढील आंदोलनात संयम ठेवला जाणार नाही, असा इशारा भूमिपुत्रांनी या वेळी सरकारला दिला.
कल्याण पूर्वेतील तीसगावनाका, चक्कीनाका, नेवाळीनाका, आडिवली ढोकळी, द्वारली भाल, काटई, मानपाडा, भोपर, शीळफाटा येथे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले होते. त्यात महिला, ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचे लोक तसेच भाजप आमदार गणपत गायकवाड, मनसे आ. राजू पाटील हेदेखील मानवी साखळीत सहभागी झाले होते.
आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, ‘दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भरपावसात भूमिपुत्र रस्त्यावर उतरला आहे. २४ जूनला याच मागणीसाठी सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आता समाजाचा संयम सुटण्याआधीच सरकारने समाजाच्या मागणीचा विचार करावा.’
आ. गायकवाड म्हणाले, ‘विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी योग्य आहे. मात्र, हे सरकार मनमानी करीत आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे विविध प्रकल्पांना दिली जात आहे. भूमिपुत्रांचे नेते असलेल्या दि.बा. पाटील यांचेच नाव विमानतळास द्यावे.’ तर, आ. पाटील म्हणाले, ‘विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसंदर्भात सरकारची भेट घेतली होती. मात्र, सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. आता मानवी साखळी शांततेत पार पडली असली, तरी समाज यापुढील आंदोलनात शांतता व संयम ठेवणार नाही.’
आडिवली ढोकळी येथे झालेल्या मानवी साखळीत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, ‘दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांच्या हितासाठी रक्त सांडले होते. त्यांचेच नाव विमानतळास द्यावे. सरकारने याप्रकरणी राजकारण करू नये.’
------------------------