रस्ता रुंदीकरणाविरोधात दिव्यात मानवी साखळी; महापालिकेच्या कारवाई केला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 11:17 PM2019-12-13T23:17:16+5:302019-12-13T23:18:17+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या परिसरात राहत असून त्याच ठिकाणी आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी त्यांनी ठाणे महापालिकेकडे केली आहे.
ठाणे: दिवा रेल्वेस्टेशनजवळ होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेत ३२ इमारतींवर कारवाई होणार असल्याने या इमारतीमधील नागरिकांनी महापालिकेच्या कारवाईला विरोध करून शुक्रवारी सकाळी मानवी साखळी तयार केली.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या परिसरात राहत असून त्याच ठिकाणी आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी त्यांनी ठाणे महापालिकेकडे केली आहे. तर विकास आराखड्यामध्ये रस्ता रुंदीकरण समाविष्ट असल्यामुळे तसेच ही सर्व बांधकामे अनधिकृत असूनही मानवतावादी दृष्टिकोनातून या नागरिकांचे पडले गावानजीक पुनर्वसन करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, रहिवाशी आपल्या मागणीवर ठाम असल्याने हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
दिवा रेल्वेस्टेशन लगत ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये या परिसरात ३५ मीटर रुंदीकरण करणे समाविष्ट केले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने रुंदीकरणाच्या आड येत असलेल्या ३२ इमारतींमधील जवळपास ३०० कुटुंबीयांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा मिळाल्यामुळे स्टेशन जवळचा आपला हक्काचा निवारा जाणार या भीतीने या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या या कारवाईचा विरोध करून स्टेशन परिसरात मानवी साखळी केली होती. या मानवी साखळीमध्ये ४०० ते ५०० नागरिक सहभागी झाले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही स्टेशन परिसरात राहत असून याठिकाणी अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत तर पालिका ज्या ठिकाणी आमचे पुनर्वसन करत आहे तो परिसर स्टेशन पासून १२ ते १५ किलोमीटर लांब असल्याने त्या ठिकाणी जाणे संयुक्तिक नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आमचे तेथेच पुनर्वसन करावे अशी या रहिवाशांची मागणी आहे.
रुंदीकरणास दोन वर्षे
ठामपाच्या म्हणण्यानुसार सध्या केवळ २५ मीटरपर्यंत रुंदीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रि या पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. हे रुंदीकरणानंतर हा रस्ता दिवा आरओबीला कनेक्टेड असेल. दुसरीकडे ही सर्व बांधकामे अनधिकृत असूनही पडले येथील परिसरात बीएसयुपी योजनेअंतर्गत या रहिवाशांचे पुनर्वसन करणार असल्याची माहिती दिली.