प्रदूषणविरहित पर्यावरणात मानवाचा विकास - अभय ओक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:11 AM2018-07-09T03:11:41+5:302018-07-09T03:16:36+5:30

पर्यावरणाच्या विकासाशिवाय माणसाचा विकास होणे अशक्य आहे. प्रदूषणविरहित पर्यावरण करू, तेव्हा मानवाचा विकास होईल. विकासात्मक कामे म्हणजेच विकास असे नाही

 Human Development in Pollutionless Environment - Abhay Oak | प्रदूषणविरहित पर्यावरणात मानवाचा विकास - अभय ओक

प्रदूषणविरहित पर्यावरणात मानवाचा विकास - अभय ओक

Next

ठाणे : पर्यावरणाच्या विकासाशिवाय माणसाचा विकास होणे अशक्य आहे. प्रदूषणविरहित पर्यावरण करू, तेव्हा मानवाचा विकास होईल. विकासात्मक कामे म्हणजेच विकास असे नाही, तर पर्यावरणाचा विकास हादेखील विकास आहे, असे मत न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.
पर्यावरण दक्षता मंडळाचा एकोणिसावा वर्धापन दिन रविवारी सहयोग मंदिर येथे पार पडला. ओक म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयावर टीका करण्याचा अधिकार सर्व नागरिकांना आहे; पण टीका करताना तो निर्णय का अयोग्य आहे, हे त्यांनी सांगावे. पर्यावरणासंबंधी आदेश दिले की, विकासाला खीळ लागते, अशी टीका न्यायाधीशांवर होते. मला प्रदूषणमुक्त जगायचे आहे, हा प्रदूषणाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु, दुर्दैवाने फार थोड्या नागरिकांना या अधिकाराची जाणीव आहे. फार थोडे नागरिक पर्यावरणासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. एखादा आदेश कायद्यात बसत नसेल, पण तो सार्वजनिक हितासाठी असेल, तर तसा आदेश सर्वोच्च न्यायालय देऊ शकते. प्रदूषणाबाबत असे अनेक आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची समाजात मात्र उपेक्षा केली जाते. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणविषयक कायद्यांवर संशोधन व्हावे आणि त्याचे शिक्षण जनसामान्यापर्यंत पोहोचावे, म्हणून संशोधन केंद्रे उभारली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट सेंटर संस्थापक व संचालक डॉ. प्रसाद मोडक यांनी जनसामान्यांच्या माध्यमातून पर्यावरण विकास याविषयी मार्गदर्शन केले तसेच पर्यावरणीय शिक्षण संस्थेचे महत्त्व सांगितले. डॉ. प्रसाद कर्णिक यांनी प्लास्टिक रिसायकलिंगची माहिती देताना प्लास्टिकचा वापर केला पाहिजे; पण तो सयुक्तिक आणि विवेकी असावा, असे सांगितले. यावेळी त्यांनी मुरबाडमध्ये सुरू असलेल्या संतुलन प्रक्रियेची माहिती दिली. कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम, उपाध्यक्ष डॉ. विकास हजीरनीस उपस्थित होते. टिटवाळा येथील ‘रुंदे’ या गावी सुरू असलेल्या ‘देवराई’ प्रकल्पाची माहिती संगीता जोशी यांनी दिली. विद्याधर वालावलकर यांनी प्रास्ताविक केले. ‘आपलं पर्यावरण’ प्रकाशित झालेल्या मासिकाबाबत डॉ. संजय जोशी यांनी माहिती दिली. रूपाली शाईवाले यांनी मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली.
 

Web Title:  Human Development in Pollutionless Environment - Abhay Oak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे