केडीएमसीच्या रुग्णालयांतील माणुसकीचे वाॅर्डही फुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:39 AM2021-04-13T04:39:09+5:302021-04-13T04:39:09+5:30

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, खाजगी आणि महापालिकेच्या कोविड रुग्णालयांतही बेड उपलब्ध नाहीत. त्यावर ...

Humanitarian wards in KDMC hospitals are also full | केडीएमसीच्या रुग्णालयांतील माणुसकीचे वाॅर्डही फुल

केडीएमसीच्या रुग्णालयांतील माणुसकीचे वाॅर्डही फुल

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, खाजगी आणि महापालिकेच्या कोविड रुग्णालयांतही बेड उपलब्ध नाहीत. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांत दोन ठिकाणी माणुसकीचा वाॅर्ड सुरू करण्यात आला. मात्र, तेही फुल झाले आहेत.

महापालिका हद्दीत दिवसाला २ हजार कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेने पहिल्या लाटेच्या वेळी सुरू केलेली सर्व जंबो आरोग्य व्यवस्था नव्याने कार्यान्वित केली आहे. महापालिकेकडे आरक्षित बेडची संख्या धरून खाजगी आणि महापालिकेच्या रुग्णालयांत सात हजार बेड उपलब्ध आहेत. आणखी बेड उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. खाजगी आणि सरकारी रुग्णालये रुग्णांनी गच्च भरली आहेत. महापालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालये ही नॉनकोविड रुग्णालये आहेत. सगळीच रुग्णालये कोविड केल्यास अन्य आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी परवड होईल. या नॉनकोविड रुग्णालयांत अँटिजन, आरटीपीसीआर चाचण्या सुरू आहेत. त्याचबरोबर लसीकरण केंद्रेही सुरू आहेत. कोरोना रुग्ण महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयांबाहेर उपचारासाठी ताटकळत उभे आहेत. महापालिकेने दिवसाला पाच हजार चाचण्या सुरू केल्या आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढविले असून, रिपोर्ट आल्यावरच रुग्णावर उपचार सुरू केले जातात. यंत्रणेवर ताण वाढल्याने आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट उशिरा उपलब्ध होत आहे. दरम्यानच्या काळात जे रुग्ण कोरोना संशयित आहेत, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात ११ बेडचा एक वाॅर्ड सुरू करण्यात आला. रविवारीच हे सर्व बेड भरले असल्याची माहिती रुग्णालयातील डॉ. प्रज्ञा टिक यांनी दिली. त्याच धर्तीवर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात किमान २० रुग्णांची व्यवस्था होईल यासाठी वाॅर्ड तयार करण्यात आला आहे. माणुसकीच्या भिंतीचा प्रयोग महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने केला आहे. त्याच धर्तीवर महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयांत सुरू केलेले हे माणुसकीचे वाॅर्ड आहेत. कोरोनाशी लढणारे आरोग्यसेवक ही हाडामांसाची माणसेच आहेत. त्यांच्यातही मायेचा ओलावा असतो. तो यानिमित्ताने दिसून आला. रुग्णांची भयावह परिस्थिती पाहून त्यांच्या मनाला पाझर फुटला. या परिस्थितीत कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य केले पाहिजे. महापालिकेने सुरू केलेल्या वाॅर्डला माणुसकीचा वाॅर्ड हे नाव देत महापालिकेच्या या कामाचे कौतुक करणारा मेसेज शिवसेनेचे पदाधिकारी राजेश कदम यांनी सोशल मीडियावर केला आहे.

--------------------------

Web Title: Humanitarian wards in KDMC hospitals are also full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.