शंभरनंबरी ‘सोनं’; डोंबिवलीच्या श्रुतिका, रिद्धी यांना १०० टक्के गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 05:31 AM2018-06-09T05:31:11+5:302018-06-09T05:31:11+5:30
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत शहरातील मुलींनी शंभरनंबरी यश मिळवले आहे. चंद्रकांत पाटकर विद्यालयातील श्रुतिका महाजन आणि टिळकनगर शाळेतील रिद्धी करकरे या दोघींनी १०० टक्के गुण मिळवले.
डोंबिवली : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत शहरातील मुलींनी शंभरनंबरी यश मिळवले आहे. चंद्रकांत पाटकर विद्यालयातील श्रुतिका महाजन आणि टिळकनगर शाळेतील रिद्धी करकरे या दोघींनी १०० टक्के गुण मिळवले. तर, विद्यानिकेतनच्या सानिका गायकवाड हिने ९९.८० टक्के गुण मिळवले. या यशामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार असल्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सकाळपासूनच धाकधूक होती. आॅनलाइनद्वारे दुपारी १ वाजता निकाल जाहीर झाला. त्यावेळेला प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. एकूणच विद्यार्थ्यांच्या यशाची टक्केवारी वाढल्याने अभिनंदनासाठी मोबाइल खणखणू लागले. फेसबुक, व्हॉट्सअॅपद्वारे अभिनंदनाचे मेसेज फिरू लागले.
चंद्रकात पाटकर विद्यालयाच्या श्रुतिका महाजन हिला परीक्षेत ९७ टक्के, तर नृत्याचे तीन टक्के, असे मिळून १०० टक्के गुण मिळाले आहेत. या यशामुळे तिला आनंदाचा सुखद धक्काच बसला आहे. दहावीच्या अभ्यासाबरोबर तिने भरतनाट्यम्चे धडे गिरवले. अभ्यासासाठी पालकांनी तिच्यावर दबाव टाकला नाही. तिला इंजिनीअरिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. तिचे वडील जगदीश हे खाजगी कंपनीत कामाला आहेत, तर आई अर्चना गृहिणी आहे. पालक व शिक्षकांनी तिच्याकडून अभ्यास करून घेतल्याने तिला हे यश मिळवणे सोपे झाले. रिद्धी करकरे हिने कोणताही खाजगी क्लास न लावता हे घवघवीत यश मिळवून इतर विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. ९६ टक्के गुणांची तिला अपेक्षा होती. मात्र, सर्व विषयांतील मिळून ९७ टक्के,तर कथ्थकचे तीन टक्के, असे १०० टक्के मिळवले आहेत. तिला वाचन व वक्तृत्वाची आवड आहे. त्यामुळे तिला अभ्यासातील संकल्पना नीट समजून घेता आल्या. त्यावर तिने भर दिला. तिला इतिहास विषयाचीही आवड आहे. यापूर्वी तिने भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. तिची आई प्रज्ञा गृहिणी आहे. तिने तिच्याकडून अभ्यास करून घेतला होता. तर, तिचे वडील प्रवीण हे तबलावादक आहेत. यूपीएसची परीक्षा देण्याचा रिद्धीचा मानस आहे.
सानिका, स्वरांगीला 99.80%
डोंबिवलीची सानिका गायकवाड आणि अंबरनाथची स्वरांगी ठाकूरदेसाई यांनी ९९.८० टक्के गुण मिळवले आहेत. सानिकाला इंजिनीअर व्हायचे आहे. त्यामुळे ती विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे. तिचे वडील संजय हे एअर इंडियात नोकरीला आहेत, तर आई संजीवनी ही गृहिणी आहे. सानिकाला ९० टक्के गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु, ९९.८० टक्के गुण मिळाल्याने तिला आनंद झाला आहे. शाळेने अभ्यासावर मेहनत घेतल्याचे तिचे म्हणणे आहे. दहावीची परीक्षा देताना तिने गांधर्व संगीत विद्यालयाच्या परीक्षाही दिल्या आहेत. त्यासाठी तिने गॅप घेतला नाही. यापूर्वी तिला अॅबॅकसच्या परीक्षेत राज्यपातळीवर सुयश मिळाले आहे. तिला संगीत आणि बॅडमिंटनची आवड आहे.
आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. वेळेचे त्यांनी पालन करावे, असा आग्रह आम्ही धरत होतो. विद्यार्थ्यांनी खूप वेळ अभ्यास केला पाहिजे, असे नाही. पण, जो थोडा वेळ अभ्यास कराल, तो मन लावून करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. त्याचे पालन केल्यानेच श्रुतिका हे यश मिळवू शकली आहे.
- रजनी म्हैसाळकर,
मुख्याध्यापिका, पाटकर विद्यालय
आमच्याकडे शिक्षक विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या शिकवतात. सराव करून घेतात. अवांतर माहिती त्यांना देतात. विद्यार्थी चांगल्या प्रकारे आकलन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळवणे सोपे गेले. - विवेक पंडित,
संस्थापक, विद्यानिकेतन