ठाण्यात काही जागांवर अडले आघाडीचे घोडे

By admin | Published: January 13, 2017 06:47 AM2017-01-13T06:47:47+5:302017-01-13T06:47:47+5:30

ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी करुन लढण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकमत झाल्याने

Hundreds of horses stuck in some seats in Thane | ठाण्यात काही जागांवर अडले आघाडीचे घोडे

ठाण्यात काही जागांवर अडले आघाडीचे घोडे

Next

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी करुन लढण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकमत झाल्याने जागावाटपाची दुसरी बैठक गुरूवारी पार पडली. त्यात शहरातील २० पॅनलवर सकारात्मक चर्चा जरी झाली असली, तरी कळवा- मुंब्रा येथील मैत्रीपूर्ण जागांचा निर्णय गुरूवारी झाला नाही. त्यातच ठाणे शहरातील काही जागांवर घोडे अडल्याने १३ पॅनलची चर्चा शिल्लक आहे. परंतु यावर योग्य तोडगा निघेल, असा विश्वास दोन्ही पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. तिला कॉंग्रेसचे बाळकृष्ण पूर्णेकर, सुभाष कानडे, मनोज ओढे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते, तर राष्ट्रवादीच्या वतीने शहर अध्यक्ष आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला आदी उपस्थित होते.
या बैठकीत ठाणे शहरातील २० पॅनलवर यशस्वी चर्चा झाली असून कोणत्या जागेवर कोणी उभे राहायचे कोणता प्रभाग कोणासाठी अतिशय स्ट्रॉंग समजला जातो, त्यानुसार जागावाटपही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार काही ठिकाणी राष्ट्रवादीचे तीन, कॉंग्रेसचा एक आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन आणि कॉंग्रेसचे दोन अशा प्रकारचे समीकरण तयार झाले असल्याचेही सांगण्यात येत आहे. सुरवातीपासून ज्या मतदारसंघावर घोडे आघाडीचे घोडे अडून होते, त्यावर आजही चर्चा झाली नाही. आमदार जितेंद्र आव्हाड हे उपस्थित नसल्याने कळवा, मुंब्य्राची चर्चा शुक्रवारी होईल. (प्रतिनिधी)

आघाडी निश्चित आहे. काही जागांचे वाटपही ठरले आहे. येत्या निवडणुकीला आम्ही आघाडीनेच सामोरे जाणार आहोत.
- मनोज शिंदे, काँग्रेस शहर अध्यक्ष
आघाडीबाबत सुरूवातीपासून सकारात्मक चर्चा सुरु आहे. ती आता पुढे सरकली आहे. काही जागांचा तिढा सुटणे शिल्लक असून शुक्रवारी त्यावर निर्णय होईल. - आनंद परांजपे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष

Web Title: Hundreds of horses stuck in some seats in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.