मकरसंक्रातीचे दान घेण्यासाठी शेकडो किलोमीटरहून वाडा-जव्हारचे आदिवासी भिवंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:37 PM2019-01-15T22:37:28+5:302019-01-15T22:47:25+5:30
भिवंडी : दरवर्षी प्रमाणे संक्रांती निमीत्ताने वाटण्यात येणारे दान स्विकारण्यासाठी वाडा,जव्हार,मोखाडा येथील आदिवासी शेकडो किलोमीटर दूरवरून सुमारे पाचशेपेक्षा जास्त ...
भिवंडी : दरवर्षी प्रमाणे संक्रांती निमीत्ताने वाटण्यात येणारे दान स्विकारण्यासाठी वाडा,जव्हार,मोखाडा येथील आदिवासी शेकडो किलोमीटर दूरवरून सुमारे पाचशेपेक्षा जास्त आदिवासी शहरातील बाजारपेठेत नवीचाळ येथे आले होते. शासन आदिवासीसाठी विविध योजना राबवित असताना देखील धान्य व वस्तूंसाठी शेकडो मीटरवरून भिवंडीत आल्याने शासनाची लक्तरे उघड्यावर पडली आहेत.
शहरातील बाजारपेठ नवीचाळ येथे संक्रांती निमीत्ताने गोरगरीबांना दान धर्म करण्याची परंपरा पन्नास वर्षापेक्षा जुनी आहे. जिल्ह्यातील आदिवासींना संक्रातीच्या दिवशी शहरातील व्यापारी व नागरिक दान करतात याची माहिती आहे. पुर्वी तालुक्यातील ग्रामिण भागातील अदिवासी दान घेण्यासाठी शहरात येत होते. परंतू तालुक्यातील ग्रामिण भागात सुधारणा झाल्याने परिसरांतील आदिवासी लोकांचे येणे कमी झाले. परंतू वाडा,जव्हार व मोखाडा भागातील आदिवासी संक्रातीचे दान घेण्यासाठी मंगळवार रोजी शहरात आले होते. काहीजण पायी तर काहीजण एस.टी.ने शहरात आले. मंगळवारी सकाळपासून नवीचाळ महालक्ष्मी मंदिर ते जैन मंदिरापर्यंत आदिवासी कुटूंबानी गर्दी केली होती. या आदिवासींना अनेकांनी तांदळाचे वाटप करीत गोणी रित्या केल्या. तर लहान मुलांना कपडे देखील वाटप करण्यात आले. तसेच तिळगुळ,धान्य,रोख रक्कम व काहींनी वस्तू वाटप केले. आश्चर्याची बाब ही आहे की शासन आदिवासी समाजासाठी विविध योजना राबवित आहे. असे असताना देखील जव्हार मोखाड्यावरून आदिवासी समाजाची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही.असे आज मोठ्या संख्येने शहरात आलेल्या आदिवासी समाजाकडून दिसून आले. शहरात सकाळपासून ते सायंकाळपर्यंत या ठिकाणी दानधर्माचे काम व्यापाऱ्यांकडून सुरू होते.