चाेरीला गेलेले शंभर मोबाइल नागरिकांना केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:43 AM2021-09-25T04:43:49+5:302021-09-25T04:43:49+5:30
भिवंडी : शहरात माेबाइलचाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, शांतीनगर पाेलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे १५ लाख रुपये किमतीचे शंभर माेबाइल ...
भिवंडी : शहरात माेबाइलचाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, शांतीनगर पाेलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे १५ लाख रुपये किमतीचे शंभर माेबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी भिवंडी परिमंडळ २ चे पाेलीस उपायुक्त याेगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत पाेलीस संकुलात हे माेबाइल नागरिकांना परत करण्यात आले.
शांतीनगर पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस उपायुक्त चव्हाण यांनी मोबाइलचोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी तपास पथके तयार करून शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत चोरीला गेलेले शंभर मोबाइल चोरट्यांकडून हस्तगत केले. शुक्रवारी पोलीस संकुल येथे नागरिकांना त्यांचे हे मोबाइल परत करण्यात आले. हरवलेले व चोरीला गेलेले मोबाइल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. या वेळी शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण काबाडी, पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक नीलेश जाधव व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.