कल्याणमधील कर्नाळा तलावातील शेकडो मासे मृत
By सचिन सागरे | Published: July 30, 2023 05:11 PM2023-07-30T17:11:20+5:302023-07-30T17:12:15+5:30
पाच दिवसांपासून या तलावात रोज शंभरच्या आसपास मृत मासे आढळत आहेत.
कल्याण : पश्चिमेकडील गौरी पाडा परिसरात असलेल्या कर्नाळा तलावातील शेकडो मासे मृत झाले आहेत. दूषित पाण्यामुळे हे मासे मृत झाल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.
मागील चार - पाच दिवसांपासून या तलावात रोज शंभरच्या आसपास मृत मासे आढळत आहेत. पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. तसेच, आजूबाजूचे सांडपाणी तलावात आल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा संशय स्थानिक रहिवाशी पंडू म्हात्रे यांनी व्यक्त केला. अचानक हे मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत असून, परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक रहिवाशी मृत मासे बाहेर काढण्याचे काम करत असल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले.
याच तलावात गेल्या वर्षी ८५ च्या आसपास कासव मृत अवस्थेत आढळून आली होती. वर्षभरानंतर पुन्हा याच तलावात मासे मृतावस्थेत आढळून आल्याने या तलावातील पाण्याचे नमुने तपासण्यात यावे, तलावातील मासे का मरत आहेत? याचे कारण शोधून उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.