पावणेतीन लाख रहिवासी टांगणीला, धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:41 AM2019-07-18T00:41:26+5:302019-07-18T00:41:32+5:30

मुंंबईत चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला, तर ८ जखमी झाले आहेत.

Hundreds of residents of Pavateni hang up, questioning dangerous buildings on the anvil | पावणेतीन लाख रहिवासी टांगणीला, धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

पावणेतीन लाख रहिवासी टांगणीला, धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

Next

ठाणे : मुंंबईत चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला, तर ८ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आजघडीला ठाण्यात अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या असल्या तरी धोकादायक इमारतींमध्ये आजही सुमारे पावणेतीन लाख रहिवाशांचे वास्तव्य आहे. त्यात इमारत किती जुनी आहे, यावर ती पडणार की नाही, असे गणित ठरत नाही. ज्या इमारती धोकादायक यादीत नाहीत, अशा इमारतीसुद्धा यापूर्वी ठाण्यात पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्यावरही टांगती तलवार असून प्रशासन आणि राजकीय नेते मात्र या विषयावर श्रेयवादाच्या लढाईत ढिम्म आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत १०३ अतिधोकादायक म्हणजेच सी वन प्रकारात मोडणाºया इमारती असून त्यातील ९४ इमारती रिकाम्या केल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर, यातील १८ इमारतींवरच पालिकेला हातोडा टाकता आलेला आहे.
उर्वरित इमारती मात्र आजही उभ्या आहेत. यामध्ये रहिवाशांचे वास्तव्य नसले, तरी येत्या काळात यातील काही कोसळल्या, तर आजूबाजूच्या रहिवाशांना मात्र निश्चित धोका होऊ शकणार आहे. दुसरीकडे ठाण्यात किसननगर, वागळे, कळवा आणि मुंब्रा यासारख्या भागांत तर अशा इमारतींचे इमलेच्या इमले उभे आहेत. किसननगर भागातील कित्येक इमारती या दाटीवाटीने उभ्या असून कोणालाही एका इमारतीतून दुसºया इमारतीमध्ये सहजासहजी उडी मारता येऊ शकत आहे.
या इमारती २५ ते ३० वर्षांहून अधिक काळ जुन्या आहेत. काही इमारतींपर्यंत तर सूर्याची किरणेसुद्धा पोहोचत नसल्याचे येथे विदारक चित्र आहे. मुंब्य्राच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. कळव्यातही अनेक भागांत अशाच इमारती आ वासून उभ्या आहेत.
ठाणेकरांना क्लस्टरचे गाजर दाखविण्यात आले आहे. त्यानुसार, सहा भागांमध्ये क्लस्टरचा सर्व्हेसुद्धा पूर्ण झाला आहे. येत्या १५ आॅगस्ट रोजी काही भागांत क्लस्टरचा नारळ वाढविला जाणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यासाठी आता राजकीय मंडळींची धावपळ सुरूझाली आहे. परंतु, असे असले तरी या धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटेल का, याचे उत्तर मात्र अद्यापही शासन किंवा या राजकीय मंडळींकडे नाही.
>स्ट्रक्चरल आॅडिटनंतरही प्रश्न जैसे थे
काही वर्षांपूर्वी नौपाड्यात धोकादायक इमारत पडून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांना आपले जीव गमवावे लागले होते. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचेही बंधनकारक केले. परंतु, आजही अनेक इमारतधारक त्यासाठी पुढे येताना दिसत नाही. महापालिकेच्या आॅडिट कमिटीवर ९५ लोकांची नियुक्तीही केली आहे. त्यानुसार, यांच्या माध्यमातून स्ट्रक्चरल आॅडिटची कारवाई केली जात आहे. परंतु, असे कित्येक उपाय केल्यानंतरही आजही धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटू शकलेला नाही. या धोकादायक इमारतींमध्ये सुमारे 55,000
कुटुंबांचे वास्तव्य असून यामध्ये रहिवाशांची संख्या ही पावणेतीन लाखांच्या घरात जात आहे. त्यामुळे या रहिवाशांचा जीव आता मुंबईच्या दुर्घटनेनंतर टांगणीला लागला आहे.
>ठाण्यात ४२८० इमारती धोकादायक : महापालिका हद्दीत १०३ इमारती या अतिधोकादायक आहेत, तर मुंब्य्रात १४६०, वागळे इस्टेट १३५५, उथळसर १०६, कळवा १३४, नौपाडा-कोपरी ७८२, माजिवडा-मानपाडा ६८, लोकमान्य-सावरकरनगर २१० आणि वर्तकनगरमध्ये ६२ अशा ४२८० इमारती अतिधोकादायक/धोकादायक आहेत. या इमारतींमधील रहिवाशांच्या तात्पुरत्या स्वरूपातील पुनर्वसनासाठी पालिकेने २५७० गाळे भाड्यानेदेखील घेतले आहेत.

Web Title: Hundreds of residents of Pavateni hang up, questioning dangerous buildings on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.