उल्हासनगरात त्रिशंकू अवस्था

By admin | Published: February 24, 2017 05:58 AM2017-02-24T05:58:47+5:302017-02-24T05:58:47+5:30

महापालिकेची सत्ता प्राप्त करण्याकरिता कुख्यात पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांच्यासोबत

Hung Station in Ulhasnagar | उल्हासनगरात त्रिशंकू अवस्था

उल्हासनगरात त्रिशंकू अवस्था

Next

उल्हासनगर : महापालिकेची सत्ता प्राप्त करण्याकरिता कुख्यात पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांच्यासोबत आघाडी करणाऱ्या भाजपाला ३३ जागांवर मजल मारता आली असली, तरी शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून आल्याने आणि साई पक्षाला ११ जागा मिळाल्याने, उल्हासनगरात त्रिशंकू अवस्था निर्माण होऊन सत्ता स्थापनेची रस्सीखेच सुुरू झाली आहे.
राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक ओमी टीममध्ये सामील होऊन भाजपासोबत गेल्यानंतर, भरत गंगोत्री यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागांवर यश मिळाले. कुठल्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत नसल्याने साई पक्षाच्या हाती पुन्हा सत्तेची चावी गेली आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने ओमी कलानी यांच्यासोबत आघाडी केली, तसेच मतांचे ध्रुवीकरण करण्याकरिता सिंधी व मराठी मुद्द्यावर निवडणूक लढली गेली. प्रभाग क्र.१७ चा सर्वप्रथम निकाल जाहीर झाला. राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री, सुनीता बगाडे, सतरामदास जेसवानी, पूजाकौर लबाना विजयी झाले. या निकालाने सर्वाधिक धक्का ओमी व भाजपाला बसला. प्रभाग क्र. १ शहाड गावठाण या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून एकमेव ज्योती गायकवाड या विजयी झाल्या असून, त्यांनी भाजपाचे दिग्गज राम चार्ली यांचा पराभव केला. मात्र, इतर तीन जागी भाजपाचे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेने मराठा सेक्शन, संतोषनगर-महादेवनगर, संभाजी चौक-लालचक्की, चोपडा कोर्ट हे आपले बालेकिल्ले राखण्यात यश मिळवले. प्रभाग क्र. २० मधून आकाश व विकास पाटील, तर प्रभाग क्र.-३ मधून ४ पैकी भुल्लर दाम्पत्य फेरमतमोजणीत निवडून आले.
प्रभाग क्र.१९ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, ऐन वेळी मीना सोंडे, विजय पाटील व किशोर वनवारी यांनी शिवबंधन तोडून काही तासांत भाजपात प्रवेश केला. या प्रकाराने सेनेला धक्का बसून वेळेअभावी शिवसेनेला चारही जागी उमेदवार उभे करता आले नाही. परिणामी, सोंडेसह चारही जण निवडून आले. भारिपच्या कविता बागुल व शिवसेनेच्या सविता दिवटे यांना समसमान मते पडली. निवडणूक अधिकारी व पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी चिठ्ठी काढून बागुल यांना विजयी घोषित केले. २०१२ च्या निवडणुकीत सुभाष टेकडीमधून बीएसपीचे दोन नगरसेवक निवडून आले होते, तर मनसेचा एक व ६ अपक्ष नगरसेवक विजयी झाले होते, तसेच काँग्रेसचे ८ नगरसेवक निवडून आले होते. मनसे, बीएसपी व अपक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला असून, काँग्रेसच्या एकमेव अंजली साळवे निवडून आल्या आहेत. प्रभाग क्र.१७ मध्येच काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीची लढत होती. त्यात राष्ट्रवादीची सरशी झाल्याने काँग्रेसच्या दिग्गज जया साधवानी, मोहन साधवानी यांचा पराभव झाला, तर भरत गंगोत्री व सतरामदास जेसवानी, सुनीता बगाडे, पूजाकौर लबाना यांचा विजय झाला आहे.

दिग्गजांचा पराभव
भाजपाचे राम चार्ली, आकाश चक्रवर्ती, प्रवीण कृष्णानी, काँग्रेसच्या जया साधवानी, शिवसेनेचे विनोद ठाकूर, विजय ठाकूर शिवसेनेचे बंडखोर सुभाष मनसुलकर, माजी महापौर आशा इदनानी, राष्ट्रवादीचे गटनेते व ओमी टीमचे प्रमुख सदस्य मनोज लासी, माजी महापौर मालती करोतिया, विद्या निर्मले, यशस्वी निर्मले यांचा पराभव झाला, तर साई पक्षाच्या अजित गुप्ता या नवख्या उमेदवाराने मनोज लासी यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले.

घराणेशाहीचा विजय
शिवसेनेतील घराणेशाहीने दणदणीत विजय मिळवला आहे. प्रभाग क्र. ३ मधून राजेंद्रसिंग भुल्लर, चरणजित कौर भुल्लर, प्रभाग क्र. १० राजेंद्र चौधरी, राजश्री चौधरी, प्रभाग क्र,-१५ मधून धनंजय बोडारे, बसुधा बोडारे अशी तीन दाम्पत्ये निवडून आली. धनंजय बोडारे यांच्या वहिनी शीतल बोडारे याही प्रभाग क्र-१५ मधून विजयी झाल्या आहेत, तर प्रभाग क्र.२० मधून आकाश व विकास पाटील हे सख्खे भाऊ, तसेच प्रभाग क्र.१० व ४ मधून पुष्पा बागुल व स्वप्निल बागुल हे मायलेक निवडून आले. स्वप्निल बागुल अवघे २२ वर्षांचे आहेत.

दिव्यात भाजपा, मनसेला फटका
दिव्यातील लोकवस्ती गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढल्याने तेथील वॉर्डांची संख्या दोनवरून वाढून ११ झाली होती. दिव्यातील मतदारांनी मनसे व भाजपाला नाकारले. तेथे शिवसेनेला ८, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळाल्या.


पंचम कलानी विजयी
पंचम कलानी प्रभाग क्र.२ मधून विजयी झाल्या. त्यांच्या वॉर्डात ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. भाजपाचे जमनुदास पुरस्वानी, हरेश जग्यासी, मीना कौर लबाना हे विजयी झाले.

Web Title: Hung Station in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.