शेकडो चालकांवर उपासमारीची वेळ; जेएनपीटी येथे महामार्गावर ट्रक, ट्रेलर्सच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:48 AM2020-04-01T00:48:32+5:302020-04-01T06:25:31+5:30
राज्यांच्या सीमा सील केल्याने अडचणी
उरण : जेएनपीटी बंदराच्या प्रवेशद्वारापासून परिसरातील महामार्गाच्या दुतर्फा गेल्या आठ दिवसांपासून कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या शेकडो ट्रक - ट्रेलर्सच्या रांगा लागल्या आहेत. सर्वच राज्यातील सीमा सील करण्यात आल्यानंतर पुढील प्रवास शक्य होत नसल्याने शेकडो चालक - क्लिनरवर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे.
उरण परिसरातील जेएनपीटी बंदरावर खासगी आणखी चार बंदरे उभारण्यात आली आहेत. आयात निर्यात व्यापारामुळे दररोज सहा ते सात हजार कंटेनरची हाताळणी केली जात आहे. देशभरातील बंदरे अत्यावश्यक सेवेत मोडली जात असल्याने जेएनपीटीसह सर्वच बंदरातून कंटेनर हाताळणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेनर वाहतूक करणाºया ट्रक- ट्रेलर्संना जिथे असाल तिथेच थांबण्याचा सूचना केल्या आहेत.