घाणेकर नाट्यगृहासमोरील स्टॅण्डवर होर्डिंग कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 03:08 AM2019-04-04T03:08:16+5:302019-04-04T03:08:37+5:30
पुण्यातील पुनरावृत्ती टळली : नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष
ठाणे : सहा महिन्यांपूर्वी पुण्यातील होर्डिंग कोसळून चार जणांचे बळी गेल्यानंतर ठाण्यातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले होते. त्यानंतर, महिनाभराने पालिका प्रशासनाने ठाण्यातील सर्व जाहिरात फलक सुरक्षित असल्याचा दाखला दिला होता; मात्र असे असतानाही बुधवारी दुपारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील जाहिरात फलक कलंडला असून खाली सायकल स्टॅण्ड असल्याने तो कोसळला नाही. स्टॅण्ड नसते, तर होर्डिंग खाली पडून जीवितहानी होण्याची शक्यताही होती.
पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेनंतर ठाण्यातील होर्डिंग्जबाबत रान उठले होते. अनेक जाहिरात फलकांविरोधात लोकांच्या, रहिवाशांच्या तक्रारी आहेत. परंतु, पालिका आणि पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जांभळीनाका येथील आत्माराम टॉवर या इमारतीत असलेल्या डिजिटल फलकाबाबत तेथील रहिवाशांनी तक्रार केली. मागील महासभेतदेखील घाणेकर नाट्यगृहासमोरील जाहिरात फलकांबाबत चर्चा झाली होती. परंतु, पालिका प्रशासनाने त्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. सुदैवाने खाली सायकल स्टॅण्ड असल्याने हे जाहिरात फलक तुटून या स्टॅण्डवर अडकून राहिले. अन्यथा, अपघात होण्याची दाट शक्यता होती. दरम्यान, हा कलंडलेला जाहिरात फलक पालिकेने सुरक्षितपणे खाली काढण्याची कार्यवाही सुरू केली. त्यामुळे धोका टळला होता.
अद्याप धोकादायक
‘लोकमत’मध्येही धोकादायक होर्डिंग्जबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर, जागे झालेल्या ठामपा प्रशासनाने या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारांनाच दिले होते. त्यानंतर, एक महिन्याने ठामपा प्रशासनाने शहरातील सर्व होर्डिंग्ज सुरक्षित असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही शहरातील अनेक होर्डिंग्ज धोकादायक आहेत.