डोंबिवली रेल्वे स्थानकात अडथळ्यांची शर्यत
By Admin | Updated: June 4, 2016 01:38 IST2016-06-04T01:38:13+5:302016-06-04T01:38:13+5:30
रेल्वे फलाट आणि लोकलच्या फूटबोर्डमधील वाढलेले अंतर, भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, अस्वच्छता, भिकारी, बंद असलेली शौचालये तसेच फलाट क्रमांक-३, ४ आणि ५वर अर्धवट

डोंबिवली रेल्वे स्थानकात अडथळ्यांची शर्यत
डोंबिवली : रेल्वे फलाट आणि लोकलच्या फूटबोर्डमधील वाढलेले अंतर, भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, अस्वच्छता, भिकारी, बंद असलेली शौचालये तसेच फलाट क्रमांक-३, ४ आणि ५वर अर्धवट शेड आदी समस्यांमुळे डोंबिवलीतील प्रवाशांची गैरसोय होत आहे. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे आणि गर्दीचे हे स्थानक असतानाही येथे रेल्वे प्रशासन कधी सुविधा पुरवणार, असा सवाल प्रवासी विचारत आहेत.
फलाट क्रमांक १-अ,२ आणि ५वर फलाट आणि लोकलच्या फूटबोर्डमध्ये मोठी गॅप आहे. त्यामुळे लोकलमध्ये चढणे-उतरणे कठीण होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना बसत आहे. दरवेळी ही गॅप कशी निर्माण होते, त्यावर प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार, प्रवाशांचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असे प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
त्याचबरोबर फलाट क्रमांक १, १-अ, २आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. ते फलाटात कुठेही झोपतात. त्यामुळे गर्दी व धावपळीच्या वेळी त्यांच्या अंगावर पाय पडून ते चावण्याची भीती आहे. अनेकदा कुत्र्यांमध्ये भांडणेही होतात. त्यांच्या भुंकण्याचा त्रासही प्रवाशांना सहन करावा लागतो. काही प्रवासी फलाटावरील कॅन्टीनमधून खाद्यपदार्थ खरेदी करून त्यांना खायला घालतात. त्यामुळे अस्वच्छतेचा मुद्दाही गंभीर बनला आहे.
स्थानकात स्वच्छतागृहांची संख्या वाढण्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातही कहर म्हणजे फलाट क्रमांक २, ३ आणि४वरील कल्याण दिशेकडील स्वच्छतागृह प्रशासनाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत आहे. प्रवासी जागा मिळेल, तिथे आडोसा घेत शौचाला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे फलाटात दुर्गंधी पसरते.
स्थानकातील पुलांवर फेरीवाले बसतात. कल्याण दिशेकडील पुलावर सकाळी आणि सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत ते ठाण मांडतात. पूर्वेला रामनगर, पश्चिमेला दीनदयाळ रोडच्या बाजूस आणि विष्णूनगर पोलीस ठाण्यासमोर रेल्वेच्या प्रवेशद्वारातच ते व्यवसाय करतात. त्यामुळे प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करतच रेल्वेस्थानक गाठावे लागते.
परिणामी, त्यांची चांगलीच दमछाक होते. पश्चिमेतील फलाटाबाहेरील बेकायदा बांधकामे हटवण्यात आली आहेत. असे असतानाही मधल्या पुलासाठी फलाट क्रमांक ‘१-अ’वर प्रवेशद्वार खुले केलेले नाही. त्यामुळे कल्याण दिशेकडून येणाऱ्या प्रवाशांना फलाट ‘१-अ’वर प्रवेश करून, तर पश्चिमेकडील प्रवाशांना आरक्षण केंद्रापर्यंत तंगडतोड करूनमधला पूल गाठावा लागत आहे.
सर्व समस्यांबाबत प्रवाशांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. त्या सोडवण्याची केवळ आश्वासनेच स्थानिक अधिकारी देत आहेत. प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. (प्रतिनिधी)