विकासकामांसाठी करावी लागली अडथळ्यांची शर्यत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 10:59 PM2019-11-17T22:59:45+5:302019-11-17T23:00:17+5:30
शहरात कलानी कुटुंबाचा दबदबा असताना विकासकामे करण्यासाठी महापौर पंचम कलानी यांना धाप लागल्याचे बोलले जात आहे.
- सदानंद नाईक, उल्हासनगर
शहरात कलानी कुटुंबाचा दबदबा असताना विकासकामे करण्यासाठी महापौर पंचम कलानी यांना धाप लागल्याचे बोलले जात आहे. तसेच विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांचे उंबरठे झिजवावे लागले. सत्ताधारी आघाडीतील मित्रपक्षाच्या अडथळ्यांमुळे कलानी कुटुंबाला महापौरपदी न्याय देता आला नाही. २२ नोव्हेंबर रोजी महापौरपदाची निवडणूक होणार असून पंचम यांचा महापौरपदाचा शेवटचा दिवस असेल.
उल्हासनगर महापालिका व शहरावर दोन ते तीन दशके एकहाती सत्ता असणाऱ्या कलानी कुटुंबाची राजकीय वाताहत झाल्याचे चित्र काही वर्षापासून दिसत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष व आमदार असणाºया ज्योती कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना करून महापालिका निवडणुकीत थेट भाजपसोबत आघाडी केली. तसेच ओमी टीम समर्थकांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरविले. हीच मोठी घोडचूक कलानी कुटुंबाला नडली.
महापालिकेवर भाजप-ओमी कलानी टीम आघाडीची साई पक्षासह सत्ता आल्यानंतर महापौरपदाच्या पहिल्या टर्मपैकी सव्वा वर्षाचे महापौरपद ओमी टीमला देण्याचे ठरले होते. सुरूवातीला सव्वा वर्षे महापौर म्हणून मीना आयलानी विराजमान झाल्या. मात्र महापौरपदी सव्वा वर्ष झाल्यानंतरही आयलानी महापौरपद सोडत नव्हत्या. यातूनच आयलानी विरूद्ध कलानी यांच्यातील राजकीय संघर्ष नव्याने सुरू झाला. मुख्यमंत्र्यांच्या घराचे उंबरठे झिजविल्यावर पंचम यांना महापौरपद मिळाले. मात्र तेव्हा भाजपने एक अट घातली आणि ती म्हणजे पंचम यांनी माध्यमांना सांगताना भाजपचे महापौर असा उल्लेख करावा. पंचम यांनी प्रत्येकवेळी ओमी टीम ऐवजी भाजपचे महापौर असे सांगून भाजपच्या अनेक कार्यक्रमांत सहभाग घेतला. मात्र त्यानंतर भाजपकडून म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही.
महापालिकेतील सत्ताधारी आघाडीतील ओमी टीम विरूद्ध भाजप व साई पक्ष असा सुप्त सामना रंगल्याने, पंचम कलानी यांना विकासकामांकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही. महापौरांचे काम पंचमऐवजी ओमी करीत असल्याची टीका झाली.
महापौर पंचम कलानी, तत्कालीन आमदार ज्योती कलानी, ओमी कलानी यांनी कमी महापौरपदाच्या कार्यकाळात विकास साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना विश्वासात घेऊन धोकादायक इमारती नियमित करणे, वाढीव चटईक्षेत्र देणे, अध्यादेश लागू करणे, एमएमआरडीए अंतर्गत कोटयवधींचा विकासनिधी आणण्याचे काम केले. मात्र म्हणावी तसी प्रसिध्दी मिळाली नाही. विकासाच्या कामात खोडा घालण्याचे काम मित्र पक्षांनी केल्याचा आरोप होत आहे.
दमछाक केल्यानंतर पंचम कलानी यांना महापौरपद मिळाले. पण त्यानंतर कामे करताना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. भाजपकडे गेल्याशिवाय कामे करताच येत नव्हती. यामुळे शहर विकासापेक्षा राजकारण महत्त्वाचे हे पुन्हा एकदा यानिमित्ताने समोर आले आहे.
शिवसेना बनली कलानी समर्थक
महापालिकेतील सत्ता ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली असून भाजपला धडा शिकविण्यासाठी ओमी कलानी टीमसह इतर लहान पक्षांचा सहयोग घेण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. ओमी टीम व शिवसेना यांच्यात अंतर्गत घडामोडी सुरू असून महापालिकेतून भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी शिवसेनेसह ओमी टीम आक्रमक झाली आहे.