मीरा भाईंदरमध्ये चक्रीवादळाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:42 AM2021-05-18T04:42:31+5:302021-05-18T04:42:31+5:30
मीरा रोड : मीरा भाईंदरकरांनी चक्रीवादळाचा विध्वंसक अनुभव सोमवारी पहिल्यांदाच अनुभवला. शहरात इमारती-राहत्या घरांचे पत्रे तौक्ते चक्रीवादळाने पत्त्यांसारखे उडवून ...
मीरा रोड : मीरा भाईंदरकरांनी चक्रीवादळाचा विध्वंसक अनुभव सोमवारी पहिल्यांदाच अनुभवला. शहरात इमारती-राहत्या घरांचे पत्रे तौक्ते चक्रीवादळाने पत्त्यांसारखे उडवून टाकले. ८०पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. पाऊस आणि वारा सुरूच असल्याने रात्री उशिरापर्यंत झाडे पडणे, पत्रे उडणे आदी दुर्घटना सुरूच होत्या.
मीरा भाईंदरमधील नागरिकांनी तौक्तेच्या रूपाने पहिल्यांदाच चक्रीवादळाच्या भयानक स्वरूपाचा अनुभव घेतला. वादळी वारे आणि तुफान पावसामुळे सकाळपासून पत्रे उडून गेल्याच्या घटना घडत होत्या. महापालिकेच्या भाईंदर, तलाव मार्गावरील प्रभाग कार्यालय, फॅमिली केअर रुग्णालय, भाईंदर स्थानकासमोरील अनुसया इमारत, पूनम सागर वसाहत आदी अनेक इमारतींचे गच्चीवर लावलेले पत्रे वादळाने उडवून लावले. उत्तन - चौक भागातसुद्धा पत्रे उडाल्याच्या अनेक घटना घडल्या. पाली येथील चर्चच्या गच्चीवरील पत्रेसुद्धा हवेत उडाले. सुदैवाने पत्रे उडून कोणाला लागले नाहीत. चक्रीवादळाचा इशारा आधीच दिला गेला असतानासुद्धा अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पत्रे उडून जाण्याच्या जास्त घटना घडल्या.
पत्रे उडण्यासह झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे आदी घटना घडत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांना पडलेली झाडे हटविण्याच्या कामात उसंत मिळत नव्हती. भाईंदर पश्चिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्गावरील रिद्धिसिद्धी इमारतीसमोरील मोठे झाड उन्मळून रिक्षावर पडले. यात रिक्षाचे नुकसान झाले. भाईंदर पोलीस ठाण्याच्या इमारतीवर आवारातील मोठे झाड पडले. गोडदेव नाका येथे रस्त्यावरच मोठे झाड पडले. शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्यासह झाडांच्या फांद्या पडण्याच्या असंख्य घटना घडल्या.