उल्हासनगरात पती-पत्नीची आत्महत्या; हाताला काम नसल्याने आर्थिक परिस्थितीतून पाऊल उचलल्याची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 11:34 AM2021-11-21T11:34:40+5:302021-11-21T11:55:41+5:30
हाताला काम नसल्याने आर्थिक परिस्थितीतून आत्महत्या केल्याचे बोलले जात असून कालच ते कोकण मधील गावातून आले होते.
-सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-१ शहाड फाटक परिसरातील राजीव गांधीनगर मध्ये राहणाऱ्या सचिन सुतार व पत्नी शर्वरी यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. रविवारी सकाळी ५ ते ६ वर्षाची त्यांची मुले झोपेतून उठल्यावर त्यांनी घराचे दार उघडून झालेला प्रकार शेजारील नागरिकांना सांगितला. स्थानिक रहिवासी व मनसेचे माजी शहरजिल्हाध्यक्ष संजय घुगे यांनी याबाबतची माहिती उल्हासनगर पोलिसांना दिली.
उल्हासनगर राजीव गांधीनगर परिसरात राहणारे सचिन सुरेश सुतार फर्निचरचे तर पत्नी शर्वरी घरकाम करीत होती. त्यांना पराग व यशार्थ असे दोन ५ ते ६ वर्षाची दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना काम नसल्याने, घरात आर्थिक अडचण जाणवत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. दरम्यान दिवाळी निमित्त कोकण रत्नागिरी येथील गावी गेलेले सुतार कुटुंब शनिवारी गावावरून परत आले. अशी प्राथमिक माहिती स्थानिक रहिवासी व मनसेचे माजी शहरजिल्हाध्यक्ष संजय घुगे यांनी दिली. शनिवारी मध्यरात्री मुले झोपल्यानंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. रविवारी सकाळी दोन्ही मुले झोपेतून उठल्यावर आई-वडील लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसल्यावर, त्यांनी घराचे दार उघडून शेजाऱ्यांना सदर माहिती दिल्याने, परिसरात खळबळ उडाली.
मनसेचे माजी शहाराध्यक्ष संजय घुगे यांनी दोन्ही मुलांना घराबाहेर ठेवून उल्हासनगर पोलिसांना झालेल्या प्रकारची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन पंचनामा करीत दोन्ही मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात उत्तर तपासणी साठी पाठविली. मयत सचिन सुतार यांचे आई-वडील व भाऊ डोंबिवली येथे राहत असून त्यांना सदर प्रकारा बाबत माहिती देऊन त्यांना बोलावून घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली. पती-पत्नीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोन्ही मुले अनाथ झाली. आर्थिक विवेचनातून आत्महत्या केल्याचे बोलले जात असून अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.