पती-पत्नीची कोर्टाबाहेरच जुंपली
By admin | Published: May 1, 2017 06:20 AM2017-05-01T06:20:22+5:302017-05-01T06:20:22+5:30
पोलीस खात्यात असलेल्या पती-पत्नीसह आणखी एका महिला पोलीस शिपायामध्ये शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयाबाहेर चांगलीच जुंपली. कौटुंबिक वादातून
ठाणे : पोलीस खात्यात असलेल्या पती-पत्नीसह आणखी एका महिला पोलीस शिपायामध्ये शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयाबाहेर चांगलीच जुंपली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.
पालघर येथील रहिवासी असलेल्या एका पोलीस शिपायाची नेमणूक ठाणे ग्रामीणमध्ये आहे. शनिवारी दुपारी हा पोलीस शिपाई त्याच्या ठाकूर नामक एका सहकाऱ्यासोबत न्यायालयात गेला. त्यांच्यासोबत दोन जमानतदारही होते. एका गुन्ह्यातील जामिनाचे काम आटोपल्यानंतर दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास ते न्यायालयाबाहेर पडले. जवळच असलेल्या बसथांब्यानजिक त्यांनी मोटारसायकल उभी केली होती. तिथे पोहोचल्यानंतर पोलीस शिपायाच्या पत्नीने त्यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली.
झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तिने ओढली. तिच्यासोबतच्या एका महिला पोलीस शिपायानेही मारहाण केल्याचा आरोप त्याने केला आहे. ठाणेनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तक्रारदार पोलिसाचे पत्नीसोबत जुने वाद आहेत. त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केलेला असून, ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. याशिवाय पत्नीने त्याच्याविरोधात शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार दिली आहे. त्या प्रकरणामध्येही अगोदरच गुन्हा दाखल झालेला आहे. घटस्फोटाच्या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच तक्रारदार पोलीस शिपायाने दुसरा विवाह केल्याची चर्चा आहे. यातूनच पती-पत्नीमधील बेबनाव वाढला आणि हे प्रकरण त्या दिवशी मारहाणीपर्यंत पोहोचले असावे, अशी माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)