एकट्याने फिरायला जाणाऱ्या पत्नीला पतीने दिला तिहेरी तलाक; पोलिसांकडून तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:08 IST2024-12-13T13:04:14+5:302024-12-13T13:08:43+5:30
ठाण्यात पतीने तिहेरी तलाख दिल्यानंतर पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

(प्रातिनिधीक छायाचित्र)
Thane Crime : ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यात एका व्यक्तीने विचित्र कारणामुळे त्याच्या पत्नीला थेट तिहेरी तलाक दिला. ३१ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला कारण ती एकटी फिरायला जात होती. आरोपी हा मुंब्रा परिसरातील रहिवासी आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१९ मध्ये तिहेरी तलाकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. जर एखाद्या पुरुषाने पत्नीला तिहेरी तलाक दिला तर त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. असं असतानाही पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी पत्नीला ट्रिपल तलाक दिल्याप्रकरणी ३१ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. क्षुल्लक कारणावरून त्या व्यक्तीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याचा आरोप आहे. मुंब्रा परिसरातील रहिवासी असलेल्या आरोपीने मंगळवारी आपल्या २५ वर्षीय पत्नीच्या वडिलांना फोन केला आणि ती एकटी फिरायला जात असल्याने तिहेरी तलाकद्वारे आमचे लग्न मोडत असल्याचे सांगितले. पोलिसांनी ही माहिती दिली.
याप्रकरणी २५ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार केली होती. यानंतर, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(४) अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केल्याने पतीने पत्नीला तिहेरी तलाख दिला होता. हिंसाचार रोखण्यात पोलिसांनी उचललेल्या पावलांचे पत्नीने कौतुक केलं होतं. त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला तिहेरी तलाख दिला.
दरम्यान, तिहेरी तलाक अंतर्गत, पती आपल्या पत्नीला ईमेल किंवा मजकूर संदेशासह कोणत्याही स्वरूपात तीनदा 'तलाक-तलाक-तलाक' बोलून घटस्फोट देऊ शकत होता. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये तिहेरी तलाकची प्रथा बेकायदेशीर ठरवली होती. भारतीय संसदेने ३० जुलै २०१९ रोजी तिहेरी तलाक विधेयक मंजूर केले. त्यानंतर लगेचच तिहेरी तलाक हा गुन्हा ठरला. मुस्लिम व्यक्तीने तिहेरी तलाक दिल्यास तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. कायद्यानुसार तिहेरी तलाक हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. तिहेरी तलाकचा वापर करून पत्नीला घटस्फोट देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागतो. वॉरंटशिवाय अटक केली जाते आणि जामीन केवळ दंडाधिकाऱ्यांच्या विवेकबुद्धीनुसार मंजूर केला जातो.