पत्नीवर खुनी हल्ला करून पसार झालेल्या पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:17 AM2019-07-09T06:17:18+5:302019-07-09T06:17:26+5:30

पत्नीच्या मामावरही केला होता चाकूने हल्ला; कासारवडवली पोलिसांनी कर्नाटकातून केले ३ महिन्यांनी अटक

The husband has been arrested by a murderous assault on his wife | पत्नीवर खुनी हल्ला करून पसार झालेल्या पतीला अटक

पत्नीवर खुनी हल्ला करून पसार झालेल्या पतीला अटक

Next

ठाणे : ठाण्यात कर्नाटक राज्यातून कामासाठी आलेली पत्नी शोभा अशोक हरिजन (४०) हिला जबरदस्तीने नेण्यासाठी पती अशोक हरिजन (४५) आला होता. त्याला विरोध केल्याने पत्नी आणि तिचा मामा दुनड्डाप्पा कट्टीमणी यांच्यावर विळ्याने वार करून कर्नाटकात तो पसार झाला होता. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी तीन महिन्यांनी त्याला शनिवारी अटक केली.

 


शोभा तिचा मामा दुनड्डाप्पा हे ५ फेब्रुवारी २०१९ रोजी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील तुर्फेपाडा प्लॅटिनम इमारतीच्या साइटवर मजुरीचे काम करत होते. ते साइटवरील लेबर कॅम्प येथील घरी असताना शोभाचा पती अशोक तिथे आला. तो तिला जबरदस्तीने गावी घेऊन जात होता. पतीकडून होणाऱ्या त्रासामुळे तिने पुन्हा त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला. मामा दुनड्डाप्पा यांनीही तिला पुन्हा घेऊन जाण्यासाठी विरोध दर्शवला. याचाच राग आल्याने अशोकने घराजवळील झाडाच्या बाजूला असलेले ऊस तोडण्याचे धारदार हत्यार घेऊन मामा दुनड्डाप्पा याच्या मानेवर, तसेच शोभाच्या डोक्यावर आणि दोन्ही हातांच्या पंजांवर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर पसार झालेल्या अशोकचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने नातेवाइकांकडे कसून शोध घेतला. दरम्यान, तो कर्नाटकातील विजापूर येथे येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एस.बी. जाधव यांना ५ जुलै रोजी मिळाली. या माहितीच्या आधारे कासारवडवली पोलिसांच्या एका पथकाने अशोक याला ६ जुलै रोजी कर्नाटकातून अटक केली. खुनी हल्ल्यासाठी वापरलेले हत्यारही त्याच्याकडून जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.


पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि निरीक्षक ए. ई. काळदाते आदींच्या पथकाने त्याला जेरबंद केले.

Web Title: The husband has been arrested by a murderous assault on his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.