पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला तीन वर्षे कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 05:36 AM2020-03-02T05:36:38+5:302020-03-02T05:36:47+5:30
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या भाईंदर येथील संजय तांगडे याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
ठाणे : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या भाईंदर येथील संजय तांगडे याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २०१६ साली भार्इंदर येथे घडली होती.
मोनिका तांगडे हे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे भार्इंदर येथील संजयशी १० जुलै २०१६ रोजी लग्न झाले होते. दोन महिन्यांनी संजय तिला त्रास देऊ लागला. आपण वेगळे राहू, असे तो बोलत होता. आॅक्टोबर २०१६ मध्ये संजयने तिला मोटारसायकलवरून खाली पाडले. यामध्ये ती जखमी झाली. दरम्यान, माहेरी गेलेल्या मोनिकाला परत आणण्यास संजय नकार देत असल्याने नोव्हेंबर महिन्यात तिच्या आईनेच तिला सासरी सोडले. लग्नाला चार महिने होत नाहीत, तोच संजय तिला त्रास देत असल्याने तिने २६ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी संजय आणि मोनिकाची जाऊ यांच्याविरुद्ध मोनिकाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने नऊ साक्षीदारांची साक्ष तपासली. त्यानुसार, संजयला शिक्षा सुनावली. तर जावेची निर्दोष सुटका केली.